न्यायालयात कचराकुंड्या महिनाभरापासून धूळखात; शिवाजीनगर न्यायालयातील परिस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 01:35 PM2018-01-22T13:35:39+5:302018-01-22T13:39:38+5:30
शिवाजीनगर येथे असलेल्या जिल्हा न्यायालयातील स्वच्छता वाढावी, यासाठी आदर पूनावाला यांच्याकडून देण्यात आलेल्या कचराकुंड्या सुमारे एक महिन्यापासून धूळखात आहे.
पुणे : शिवाजीनगर येथे असलेल्या जिल्हा न्यायालयातील स्वच्छता वाढावी, यासाठी आदर पूनावाला यांच्याकडून देण्यात आलेल्या कचराकुंड्या सुमारे एक महिन्यापासून धूळखात आहे.
महिनाभरापूर्वी न्यायालयात दाखल झालेल्या ११० पैकी फक्त ३० कचराकुंड्याच आतापर्यंत विविध ठिकाणी बसविण्यात आल्या आहेत. विविध कामांनिमित्त न्यायालयात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या ठिकाणी कचरा होण्याचे प्रमाणदेखील जास्त आहे. यामुळे या परिसराची स्वच्छता व्हावी, म्हणून यासाठी आदर पूनावाला यांच्याकडून क्लीन सिटी इनिशिएटिव्ह अंतर्गत या कचराकुंड्या न्यायालय आवारात बसविण्यासाठी देण्यात आल्या आहेत. त्यातील काही कुंड्या जुनी इमारत परिसरात बसविण्यात आल्या आहेत. पण अद्याप अनेक कुंड्या गेट नंबर ३ समोरच पडून आहेत. दरम्यान यापुर्वीही आदर पूनावाला यांच्याकडून न्यायालयांच्या स्वच्छतेसाठी दोन क्लीनिंग मशिन व त्यासाठी दोन कर्मचारी देण्यात आले आहेत. या दोन्ही मशिनद्वारे दिवसभर न्यायालयातील स्वच्छता करण्यात येत असते. संध्याकाळच्या वेळी साचलेला कचरा एकत्र करण्यात येतो.
पुणे जिल्हा बार असोसिएसनचे उपाध्यक्ष हेमंत झंजाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, बार असोसिएशन आणि जिल्हान्यायाधीश न्यायालयाचा आढावा घेणार आहे. त्यानंतर कोणकोणत्या ठिकाणी या कुंड्या बसवायच्या, याचा निर्णय घेण्यात येणार आहे. लवकरच या सर्व कुंड्या योग्य त्या ठिकाणी बसविण्यात येणार आहे. त्यामुळे न्यायालयातील स्वच्छतेत वाढ होण्यास मदत होणार आहे.