घाट आहे की कचराकुंडी? बोपदेव घाटाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 02:43 AM2017-12-01T02:43:41+5:302017-12-01T02:43:50+5:30
सासवड-हडपसर रस्त्यावरील दिवे घाट व सासवड-कोंढवा रस्त्यावरील बापदेव घाट रस्त्याच्या बाजूस राजरोस कचरा रसवंती गृहांची ऊसाची चिपाडे टाकण्यात येत आहेत.
सासवड : सासवड-हडपसर रस्त्यावरील दिवे घाट व सासवड-कोंढवा रस्त्यावरील बापदेव घाट रस्त्याच्या बाजूस राजरोस कचरा रसवंती गृहांची ऊसाची चिपाडे टाकण्यात येत आहेत. याचे दिवसेंदिवस प्रमाण वाढत असल्याने याठिकाणी कचरा टाकणा-यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पुरंदर तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष शिवाजी पोमण यांनी केली आहे.
दिवे तसेच बापदेव घाटात रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुर्गंधीयुक्त कचरा टाकण्यात येतो आहे. यामध्ये रसवंती चालकांनी टाकलेली ऊसाची चिपाडे, हॉटेलमधील खरकटे, शहरातील ओला कचरा, मातीचा राडा रोडा, मृत कोंबड्या, जनावरे, कुजलेला नासलेला भाजीपाला, खराब फळे आदी कचरा या ठिकाणी रस्त्याच्या कडेलाच टाकला जातो काही वेळ तर तो रस्त्यावरही येत असल्याने वाहनांचे किरकोळ अपघातही झाले आहेत.
या ठिकाणी हा कचरा पेटविण्याचे प्रकार घडत आहे.
त्यामुळे या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. हे प्रकार जर आत्ताच रोखले नाहीत तर भविष्यात याची मोठी किंमत मोजावी लागेल. या ठिकाणी वणवा लागण्याची मोठी भीती आहे. या परिसरात वन्यजीवांचा मोठा वावर आहे.
वणव्याने त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहील, त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होणार
आहे. पर्यावरण वाचविण्यासाठी संबधित विभागाने कारवाई
करावी, अशी मागणी करण्यात
आली आहे.
वन्यजीवांच्या जीवितासही धोका
मुदतबाह्य औषधे बॅच नंबर, कंपनीचे नाव ओळखू येऊ नये म्हणून ती जाळण्यात येतात. त्याच्या धुराचा त्रास वाहनचालकांना होतो. तसेच त्या औषधांचे वेष्टन फुटल्याने ती पाण्यात अनेक वेळा मिसळल्यामुळे वन्यजीवांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे.
अशा प्रकारे रस्त्यावर कचरा टाकणे व जाळणे गुन्हा आहे. रस्त्यावर कचरा टाकताना जर कोण आढळला तर त्याच्या विरोधात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिका-यांना पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचा अधिकार आहे.
कारवाई किंवा दंड करण्याचा अधिकार तालुक्याचे तहसीलदार यांना आहेत. सध्या हडपसर-सासवड रस्ता देखभालीसाठी कोणाच्या अधिकारात आहे याची अधिकृत माहिती मिळत नाही.