फिरोदिया करंडकावर ‘गरवारे वाणिज्य महाविद्यालया’ची मोहोर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 02:08 PM2019-02-26T14:08:12+5:302019-02-26T14:08:51+5:30
फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेमध्ये गरवारे वाणिज्य महाविद्यालयाने करंडकावर आपली मोहोर उमटविली. विजेत्या संघाच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घोषणा देत सभागृहाचा परिसर दणाणून सोडला.
पुणे : फिरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेमध्ये गरवारे वाणिज्य महाविद्यालयाने करंडकावर आपली मोहोर उमटविली. विजेत्या संघाच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घोषणा देत सभागृहाचा परिसर दणाणून सोडला. स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या नऊ संघाचे बिबवेवाडी येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात जल्लोषात सादरीकरण झाले.
निकालाची घटिका समीप येताच कोणता संघ निवडून येणार याबाबत सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. विद्यार्थ्यांना काहीसे दडपण जाणवत होते अखेर तो क्षण आला ज्याची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहात होते आणि गरवारे वाणिज्य महाविद्यालयाच्या ‘रस्ता ए सुगंध’ या एकांकिकेचे प्रथम क्रमांकाच्या विजेतेपदासाठी नाव घोषित होताच विद्याथ्यार्नी एकच जल्लोष केला. स्पर्धेत पद्मश्री वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ( द फादर ऑफ ६६९) या संघाला द्वितीय तर पी.ई. एस. मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालय ( इखतीलाफ) आणि पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी ( नकाब) या दोन संघाना तिसरा क्रमांक विभागून देण्यात आला. सलग दुसऱ्यांदा इन्स्टिट्यूट ऑफकम्प्युटर टेक्नॉलॉजीने तिसºया क्रमांकावर आपले स्थान राखले. स्पर्धेच्या अंतिम फेरीचे परीक्षण स्वप्नील जोशी, परेश मोकाशी, तेजस्विनी पंडित, दीपक राजाध्यक्ष आणि किरण यज्ञोपवित यांनी केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल :
वैयक्तिक पारितोषिक :विद्यार्थी लेखक :प्रणव आपटे , गरवारे कॉमर्स (प्रथम), प्रणव पाटील, पीईएस मॉडर्न सीओई आणि प्रशांत भिवसाने, पीआयसीटी, (द्वितीय),वेदांत नाईक, पीव्हीपीआयटी (तृतीय).
विद्यार्थी दिग्दर्शक : सौरव बिवरे आणि वेदांत नाईक , पीव्हीपीआयटी(प्रथम), शुभम कुलकर्णी, गरवारे कॉमर्स (द्वितीय), सिद्धांत पाटील आणि संदेश पवार,पीईएस मॉडर्न सीओई (तृतीय).
अभिनय ( पुरूष): नाथ पुरंदरे, स.प महाविद्यालय ( प्रथम), शुभम कुलकर्णी, गरवारे कॉमर्स (द्वितीय), ओजस नेटके, पीआयसीटी( तृतीय),वजरांग आफळे ,मॉडर्न एसीएस ( उत्तेजनार्थ). ( स्त्री) : प्रांजली सारजोशी, डीवायपी, एमईआर(प्रथम), ऐश्वर्या तुपे, गरवारे आणि अपूर्वा झोळगीकर, व्हीआयटी( द्वितीय),मृनमयी जोगळेकर , पीईएस मॉडर्न सीओई, श्रद्धा कांबळे , जीसीओई, औरंगाबाद (तृतीय), पायल काळे, जेएसपीएम ( उतेजनार्थ).
नेपथ्य : अवीर रेवणेकर, अमित चक्रवर्ती ( प्रथम), निखिल कदम ( द्वितीय),अनुजा वाटपाडे (तृतीय).
प्रकाश योजना : नरेंद्र खके (प्रथम), श्रेयस किराड (द्वितीय). वेशभूषा : पूर्वा देशपांडे (प्रथम).