पुणे : अनुवाद करताना मूळ लेखकाच्या विचारांचा आत्मा जपता आला पाहिजे, अशी भावना सुजाता देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.सुजाता देशमुख यांच्या अनुवादित ‘गौहर जान म्हणतात मला’ या पुस्तकाला साहित्य अकादमीचा उत्कृष्ट अनुवादाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘साहित्य अकादमीचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याने निश्चितच आनंद झाला आहे. या पुस्तकातून कोलकात्याच्या गायिका गौैहर खान यांचा जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची पहिली रेकॉर्ड ब्रिटिशांनी प्रसिद्ध केली. गायिका म्हणून झालेला प्रवास, त्या काळातील सामाजिक स्थित्यंतरे मांडण्याचा हा प्रयत्न आहे, असे देशमुख म्हणाल्या.‘अनुवाद करताना मूळ लेखकावर अन्याय न करता त्याचे म्हणणे योग्य पद्धतीने इतर भाषेत घेऊन जाणे, हे आव्हान असते. माझ्या प्रत्येक अनुवादित पुस्तकामध्ये मी पुस्तकाचे शीर्षकही अनुवादित केले आहे. अनुवाद करताना मूळ लेखकाला काय म्हणायचे आहे, हे आधी जाणून घ्यायला हवे. दुसऱ्याचे मूल आपल्याला निगुतीने सांभाळता यायला हवे. त्या भाषेतील संकल्पना स्पष्ट करताना त्या अंगभूत वाटणे गरजेचे असते. लेखकाने ज्या प्रवृत्तीने लिहिले आहे, ही प्रकृतीही जोपासायला हवी, अशी अपेक्षाही सुजाता देशमुख यांनी बोलून दाखविली.‘माझंही एक स्वप्न होतं’, ‘बाइकवरचं बिऱ्हाड’, ‘तिची मोहिनी’, ‘नीलची शाळा’, ‘देश माझा, मी देशाचा’ (लालकृष्ण अडवाणी यांचे आत्मचरित्र), ‘दहशतीच्या छायेत’ आदी अनुवादित पुस्तकेत्यांच्या नावावर आहेत.
शेती संस्कृतीचा सन्मान : कवी श्रीकांत देशमुखजागतिकीकरणानंतर शेतीचे बदललेले अवकाश कवेत घेण्याचा प्रयत्न ‘बोलावें ते आम्ही’ या काव्यसंग्रहातून केला आहे. त्याची राष्ट्रीय पातळीवर घेतली गेलेली दखल हा शेती संस्कृतीचा सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त श्रीकांत देशमुख यांनी व्यक्त केली. लातूर येथे विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था) म्हणून कार्यरत असलेले कवी देशमुख यांनी गद्य व पद्य स्वरूपात विपुल लेखन केले आहे. राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेचा पुरस्कार घोषित झाल्यानंतर ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, की कष्टकरी, दलित यांचे दु:ख व वेदना ही माझ्या लेखनाची मध्यवर्ती संकल्पना आहे.‘बोलावें ते आम्ही’ हे काव्यसंग्रहाचे नाव संत तुकोबाराय यांच्या अभंगातील ओवीचे आहे. तुकोबा, छत्रपती शिवराय, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारपरंपरा आम्ही मानतो. शेतीव्यवस्थेतील दु:ख व वेदना यांचा शोध घेणे, ही जबाबदारी वाटते. त्यामुळे लेखनात कष्टकऱ्यांचे आयुष्य आणि वेदना उमटली आहे. हा भूमिनिष्ठ बनलेल्या ‘बोलावें ते आम्ही’ काव्यसंग्रह ग्रंथाली प्रकाशनाने वाचकांसमोर आणला आहे, असेही देशमुख म्हणाले. मूळचे सिंदखेडराजाजवळील राहिरी येथील रहिवासी असलेले श्रीकांत देशमुख यांचे औरंगाबाद व जालना येथे शिक्षण झाले. काही काळ प्राध्यापक म्हणून कार्यरत राहिल्यानंतर त्यांनी शासकीय सेवा स्वीकारली. ते नांदेड येथे साखर सहसंचालक होते व सध्या लातूरला विभागीय सहनिबंधक आहेत.