मार्गासनी : शिवछत्रपतींना स्वराज्य निर्माण करण्यासाठी या भूमीतील मावळ्यांनी साथ दिली. आता देशासाठी छत्रपतींच्या खोऱ्यात सैनिक तयार व्हावेत, अशी अपेक्षा माजी सैनिक विकास संस्था भोर वेल्ह्याचे अध्यक्ष नानासाहेब समगिरे यांनी केले. छत्रपतींच्या कर्मभूमीत भोर वेल्हातील तरुण देशसेवेसाठी तयार व्हावेत. यासाठी तरुणांसाठी कार्यशाळा व मार्गदर्शन शिबिरे संस्थेच्या माध्यमातून आयोजित केली जातील.
यावेळी वेल्ह्याचे गटविकास अधिकारी मनोज जाधव, माजी सैनिक चंद्रकांत राऊत, अशोक लिम्हण, मारुती राऊत, जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, दिनकर धरपाळे, सीमा राऊत, वेल्हे तालुका काँग्रेस अध्यक्ष नाना राऊत, संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वीरपत्नी नीलम शिळीमकर व वीरमाता ध्रुपदाबाई शिळीमकर यांचा विशेषसत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कुणाल शिळीमकर, माजी सैनिक चंद्रकांत राऊत, अशोक लिम्हणयांनी परिश्रम घेतले.विहीर (ता. वेल्हे) येथील कारगिल युद्धातील शहीद संभाजी लक्ष्मण शिळीमकर यांच्या विसाव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात समगिरे बोलत होते. ते म्हणाले, की माजी सैनिकांसाठी भोर वेल्हा विकास सेवा संस्था मोठ्या प्रभावीपणे काम करीत त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यास कटिबद्ध आहे.