पुणे - पुणे जिल्ह्याचे वैभव असलेल्या सिंहगड किल्ल्यावर जाणाºया पर्यटकांसाठी एका आॅस्टेलियन कंपनीकडून ‘रोप-वे’ तयार केला जाणार असून त्यासाठी तब्बल ११६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, असे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.सिंहगडावर जाण्यासाठी अरुंद रस्त्या असल्याने पर्यटकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. तसेच, पावसाळ्यात दरड कोसळत असल्यामुळे रस्ता बंद करावा लागतो. परिणामी पर्यटकांना गडावर जाताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. परंतु, सिंहगड किल्ल्यावर १.८ किमी लांबीचा ‘रोप-वे’उभारला जाणार आहे.परिणामी सिंहगड किल्ल्यावर जाणे सोपे होणार आहे.शहरापासून जवळ असलेल्या सिंहगडावर किल्ला पाहण्यासाठी पावसाळ्यात नेहमी गर्दी होते. त्यातही शनिवार, रविवारी आणि सुटीच्या दिवशी पर्यटक मोठ्या संख्येने गडावर जातात. गडावर जाण्याचा रस्ता खराब असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.त्यामुळे काही दिवस रस्त्या बंद ठेवावा लागणार आहे. या पूर्वीही सुमारे दीड महिने गडावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे पर्यटकांची गैरसोय झाली होती. तसेच गेल्या काही वर्षांपासून सिंहगडावर रोप-वे तयार केला जाणार असल्याची केवळ चर्चा केली जात होती.परंतु, रोप-वे करण्यास वन विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे रोप-वे चे काम सुरू करणे शक्य झाले आहे. रोप-वे झाल्यामुळे एका तासात सुमारे 100 पर्यटक किल्ल्यावर जाऊ शकतील. किरण गित्ते म्हणाले की, वन विभागाकडून या प्रकल्पास मान्यता मिळालेली असून हा प्रकल्प ११६ कोटींचा असणार आहे. यातील सुमारे ४१ कोटी रोप-वेसाठी खर्च होतील. उर्वरित रक्कम पायाभूत सुविधांसाठी खर्च केली जाणार आहे. सिंहगड किल्ल्यावर जाण्यासाठी आतकरवाडी येथून पायवाट असून त्याच परिसरात हा रोप-वे तयार केला जाईल.
‘सिंहगडा’वर जाण्यासाठी ‘रोप-वे’, ११६ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 3:40 AM