पुणे : लाेकसभा निवडनुकीची आचारसंहिता लागू झाल्याने पालकमंत्री आणि महापाैरांनी आपल्या शासकीय गाड्या परत केल्या. त्यानंतर हे दाेन्ही लाेकप्रतिनिधी दुचाकीवरुन आपल्या पुढील कार्यक्रमांना गेले. पुण्यात हेल्मेट सक्ती असल्याने पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी हेल्मेट परिधान केले. परंतु महापाैर ज्या दुचाकीवरुन गेल्या त्या दुचाकीच्या चालकाने हेल्मेट परिधान केले नव्हते.
नाेव्हेंबरपासून पुण्यात हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीचालकांना दंड करण्यात येत आहे. चाैकाचाैकात वाहतूक पाेलीसांकडून हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. या हेल्मेट सक्तीच्या विराेधात विविध राजकीय पक्षांनी निदर्शने केली. शहरात वाहतूकीचा वेग ताशी 20 ते 30 असताे असे असताना शहरात हेल्मेट सक्ती नकाे अशी मागणी करण्यात येत हाेती. परंतु सर्वाेच्च न्यायालयाचा आदेश असल्याने तसेच हेल्मेट न घातल्यामुळे अपघातात अनेक दुचाकीचालकांना आपले प्राण गमवावे लागल्याने हेल्मेट सक्ती गरजेचे असल्याचे पाेलिसांकडून सांगण्यात आले. गल्ली बाेळात हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई करु नये असं बापट यांनी जानेवारीमध्ये सुचवलं हाेतं. त्यानंतरही हेल्मेट सक्तीची कारवाई जाेरदार सुरु आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर गिरीश बापट यांनी सरकारी वाहन परत केले. त्यानंतर ते दुचाकीवरुन हेल्मेट परिधान करुन पुढील कार्यक्रमाला गेले. महापाैर मुक्ता टिळक यांनी त्यांचे वाहन परत केल्यानंतर त्या दुचाकीवरुन पुढील कार्यक्रमास गेल्या परंतु त्या ज्या कार्यकर्त्याच्या दुचाकीवरुन गेल्या त्या कार्यकर्त्याने हेल्मेट परिधान केले नव्हते. तसेच महापाैरांनी देखील हेल्मेट परिधान केले नव्हते. या नेत्यांचे छायाचित्र आज वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले. त्यामुळे यावर चांगलीच चर्चा पुणेकरांमध्ये रंगली हाेती.