धनकवडीतील विशेष मुलांच्या विद्यालयात मुलीला काठीने मारहाण: विद्यार्थिनी अत्यवस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 08:45 PM2018-08-18T20:45:46+5:302018-08-18T20:48:35+5:30
धनकवडी येथील मोहननगर भागात एका टु बीएचकेमध्ये अक्षरस्पर्श नावाचे विशेष मुलांचे विद्यालय आहे. त्यात १० ते १२ विद्यार्थी आहे.येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता त्यांनाही काठीने बेदम मारहाण होते.
पुणे : विशेष मुलांच्या विद्यालयात असलेल्या विद्यार्थ्यांना शिळे खाद्यपदार्थ जेवण्यासाठी देऊन अत्यंत अस्वच्छ ठिकाणी त्यांना ठेवले जात आहे. तसेच त्यांना काठीने मारहाण होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. धनकवडी भागात एका फ्लॅटमध्ये सुरू विद्यालयात हा सर्व प्रकार सुरू असून त्यातील एका विद्याथिर्नीला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सामाजिक कार्यकर्त्या कांचन दोडे, किर्ती भंडगे आणि रजनी जोगदंड यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. दरम्यान, याबाबत सहकारनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेची चुलत १८ वर्षांय बहिनीने दिलेल्या फिर्यादीनुसार, संस्थाचालक महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,धनकवडी येथील मोहननगर भागात एका टु बीएचकेमध्ये अक्षरस्पर्श नावाचे विशेष मुलांचे विद्यालय आहे. त्यात १० ते १२ विद्यार्थी आहे. फिर्यादी या बिबवेवाडीतील राहायला असून त्यांच्या कुटुंबियांनी १६ वर्षीय पीडित मुलीला २७ जुलै २०१७ ते ४ जून २०१८ दरम्यान या विद्यालयात दाखल केले होते. काही दिवसांनी तिचे पालक तिला भेटण्यास गेले. त्यावेळी तिची मानसिक तसेच शारिरीक स्थिती खालावल्याचे त्यांना आढळले. त्यामुळे पालकांनी तत्काळ तिला ससून रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी तिला योग्य औषध दिले गेले नसून, अंगावर मारहाणीच्या जखमा आहेत. विद्यालय प्रशासनाने तिच्याकडे योग्य प्रकारे लक्ष न दिल्याने संसर्ग होऊन तिची परिस्थिती नाजूक झाली आहे. ती गेल्या २१ दिवसांपासून उपचार घेत आहे.
दरम्यान हा प्रकार समजल्यानंतर कुटुंबियांनी दोडे यांच्याशी संपर्क साधला व त्यांना पुर्ण माहिती दिली. त्यानंतर दोडे यांनी विद्यालयात जाऊन चौकशी केली. त्यावेळी महाविद्यालय घाणीचे साम्राज्य असल्याचे दिसले. तसेच, येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता त्यांनाही काठीने बेदम मारहाण होते. तसेच, मुलांना अस्वच्छ आणि खुप दिवसांचे तेलकट खाद्यपदार्थ खाण्यास दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना दररोज दुध नसलेला चहा दिला जातो. जेवण म्हणून फक्त भात आणि वरण दिले जात. दोडे यांनी या सर्व प्रकाराचे व्हिडीओ शुटींग केले आहे. आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर हे प्रकरण सामाजिक सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ निरीक्षक मनिषा झेंडे यांच्याकडे पाठविण्यात आले होते. पोलीस उपनिरीक्षक ई. जे. शिलेदार याप्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.