लोणी काळभोर येथे बारावीच्या परीक्षेत कॉपी असल्याच्या संशयाने मुलीचे कपडे काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 04:15 PM2018-03-03T16:15:06+5:302018-03-03T16:15:06+5:30
बारावीच्या परीक्षेत कॉपी असल्याच्या संशयाने आल्याने ८० मुलींची कपडे काढून तपासणी केल्याचा घृणास्पद प्रकार लोणी काळभोर येथील एमआयटी युनिव्हर्सिटीच्या विश्वराज गुरुकुल या नामांकित शाळेत घडला आहे.
लोणी काळभोर : बारावीच्या परीक्षेत कॉपी असल्याच्या संशयाने आल्याने ८० मुलींची कपडे काढून तपासणी केल्याचा घृणास्पद प्रकार लोणी काळभोर येथील एमआयटी युनिव्हर्सिटीच्या विश्वराज गुरुकुल या नामांकित शाळेत घडला असून. सदर प्रकारामुळे मुलींमध्ये भींतीचे तर पालकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
सदर प्रकार येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनीसेबत घडला आहे. या ज्युनिअर कॉलेजचे वाणिज्य विभागाचे १२५ परीक्षार्थी विश्वराज गुरुकुल मध्ये परीक्षा देत असून यांमध्ये ८० मुली आहेत. २८ फेब्रुवारी रोजी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाचा पेपर असल्याने सर्व विद्यार्थी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास गेले. मुख्य गेटमधून सर्वांना आत घेतल्यानंतर फक्त पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना बाजूला घेऊन मुख्याध्यापक बाविस्कर यांनी तुम्ही परीक्षेत कॉपी करत आहात. तपासणी केल्याशिवाय तुम्हाला परीक्षेस बसता येणार नाही असे सांगितले.
त्यानंतर मुले व मुलींना वेगवेगळ्या खोलीत नेऊन त्यांची तपासणी करण्यात आली. मुलींची तपासणी महिलांनी केली. यावेळी त्यांच्या अंगावरील अंतरवस्त्रे सोडून सर्व कपडे काढण्यात आल्याची माहिती मुलींनी दिली. सदर खोलीचा दरवाजा बंद असला तरी सर्व खिडक्या उघड्या होत्या असे मुलींनी पालकांना सांगितले. यावेळी एका मुलीने आपले पालक आल्याशिवाय तपासणी करून देणार नाही असे ठणकावून सांगितले. तिची तपासणी केली नाही. तर एका मुलीला मासिक पाळी आलेने यांसाठी तिने वापरलेले पॅडही ऊचकटून तपासण्यात आले. तपासणी मध्ये कोणत्याही विद्यार्थ्यांकडे काहीही आक्षेपार्ह मिळून आले नाही. त्यानंतर त्यांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश देण्यात आला.
सदर बाब एका मुलीने आपले वडिलांना सांगितले नंतर ते दुसरे दिवशी मुख्याध्यापक बाविस्कर यांना भेटले व विचारणा केली असता त्यांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तर देण्याचे टाळले. सदर प्रकार सर्व पालकांना समजल्यावर आज पालकांनी बाविस्कर यांची भेट घेऊन जाब विचारला असता त्यांनी तुम्हाला काय करायचे ते करा असे सांगितले. सर्व पालक संतापले व त्यांनी लोणी काळभोर पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडूभैरी यांची भेट घेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन घेण्याचे काम सुरू आहे.