कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा (ता. शिरूर ) येथे दोन दिवसापूर्वी चोरट्यांनीचोरून नेलेली स्कॉर्पिओ कार अहमदनगर जिल्ह्यामध्ये आढळून आली. चोरट्यांनी चक्क त्याच स्कॉर्पिओ गाडीमध्ये मोठ्या कागदावर ही गाडी कोरेगाव भीमा येथून चोरलेली असून मूळ मालकाला परत मिळावी असा संदेश घेऊन ठेवल्यामुळे पोलीस प्रशासन देखील चक्रावून गेले आहे.
याप्रकरणी गाडीचे चालक गणेश गुलाबराव जाधव (रा. कोरेगाव भीमा ता. शिरूर ) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव भीमा येथील विजय गव्हाणे यांच्या स्कॉर्पिओ गाडीचा चालक गणेश जाधव याने सहा ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास त्याच्या ताब्यातील (एमएच १२ एस एफ १८८७) ही स्कार्पिओ गाडी सत्यनारायण क्लॉथ सेंटर जवळील मोकळ्या जागेत लावून घरी जाऊन झोपला होता. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी स्कार्पिओ काच फोडून आतमध्ये प्रवेश करून गाडी चोरून नेल्याची घटना घडली होती. याबाबत गाडीचे चालक गणेश गुलाबराव जाधव (रा. कोरेगाव भीमा ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला होता. मात्र, आठ ऑक्टोबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस रात्री गस्त घालत असताना त्यांना रस्त्याच्या कडेला एक स्कॉर्पिओ गाडी संशयित रित्या दिसून आली यावेळी पोलिसांनी स्कॉर्पिओ जवळ जाऊन पाहणी करत दरवाजा उघडला असता त्या स्कॉर्पिओ मध्ये एक मोठा पुठ्ठ्याचा कागद दिसून आला व त्या कागदावर ही गाडी कोरेगाव भीमा पुणे पोलीस स्टेशन येथून चोरली असून ती मूळ मालकाला परत मिळावी असा फलक लिहिलेला दिसून आला. त्यामुळे अहमदनगर पोलिसांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फोन करून याबाबत चौकशी केली असता ती गाडीची कोरेगाव भीमा येथून चोरी झाली असल्याचे समोर आले. त्यानंतर शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलीस नाईक योगेश नागरगोजे, संतोष शिंदे यांनी कोतवाली पोलिस स्टेशन येथे जात पाहणी केली असता ही गाडी कोरेगाव भीमा येथून चोरी गेली असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर स्कॉर्पिओची पाहणी केली असता गाडीतला एक मोठा पार्ट चोरट्यांनी चोरून नेला असल्याचे समोर आले. मात्र इतक्या महागड्या गाडीची चोरी करून देखील चोरट्यांनी पोलिसांना संदेश दिला असल्याने पोलीस प्रशासन देखील चक्रावून गेले. त्यानंतर पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यातील स्कॉर्पिओ ताब्यात घेतलेली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सचिन मोरे हे करत आहे.