पुणे : जिजाऊंनी फक्त शिवरायांना नव्हे, तर सर्व मावळ्यांनादेखील संस्काराने वाढविले होते. स्त्री आदर शिकवला होता. सध्या समाजात स्त्री अत्याचार वाढताना दिसत आहेत. प्रत्येक घराच्या उंबरठ्यावर वाईट प्रसंग उद््भवत आहे. आज मुलांना ‘परस्त्री मातेसमान’ ही शिकवण देण्याची नितांत गरज आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलाला ही शिकवण दिली तर आजची परिस्थिती नक्की बदलेल, असे मत साहित्यिक कौमुदी गोडबोले यांनी व्यक्त केले. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, समस्त हिंदू आघाडी, लालमहाल उत्सव समिती, स्वरूपवर्धिनी व जिजामाता तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पौष पौर्णिमा, स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाबाई यांच्या जयंती उत्सवाचे लालमहालात आयोजन करण्यात आले, त्या वेळी त्या बोलत होत्या. सामाजिक कार्यकर्ते मिलिंद एकबोटे, प्रा. संगीता मावळे, स्वरूपवर्धिनीच्या पुष्पा लडे, शुभांगी आफळे, शाहीर हेमंतराजे मावळे, प्रीती शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी ५ आदर्श मातांचा सन्मान करण्यात आला. यांमध्ये शहीद जवान सौरभ फराटे यांच्या माता मंगला फराटे यांच्यासह तुळसा कबाडी, भारती गिते, शांताबाई पवार, लीलाबाई पवळे यांचा सन्मान करण्यात आला. सन्मानपत्र, शाल, श्रीफल व भेटवस्तू, असे सन्मानाचे स्वरूप होते.गोडबोले म्हणाल्या, ‘‘मुलांना लहान वयातच स्त्रियांचा आदर करण्याची शिकवण दिली पाहिजे, तर चांगली व सुसंस्कृत पिढी घडेल. चांगली पिढी घडली, तर समाजातील वातावरण चांगले असेल. तरच, या वातावरणात आपल्या माता-भगिनी सुरक्षित राहतील. जिजाऊंनी शिवरायांना धाडसी व धोरणी बनविले. त्याप्रमाणे आपण मुलांना शिकवण देण्याची गरज आहे. आजच्या पिढीमध्ये सहनशक्तीची कमतरता दिसते; त्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. मुलांना या परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जायला शिकवा, असेही त्यांनी सांगितले.या वेळी जिजामाता यांचा आदर्श समोर ठेवून आपल्या मुलांना वाढवणाऱ्या ५ आदर्श मातांचा सन्मान करण्यात आला. या वेळी पोवाडे सादर करण्यात आले. चारुलता काळे यांनी सूत्रसंचालन केले. सारिका वारुळे यांनी आभार मानले.
‘परस्त्री मातेसमान’ ही शिकवण मुलांना द्या
By admin | Published: January 14, 2017 3:31 AM