सीएनजीचे पैसे वेळेवर देऊ : पीएमपीचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 07:46 PM2019-05-27T19:46:15+5:302019-05-27T19:49:25+5:30
‘पीएमपी’च्या ताफ्यात सुमारे ११५० बस सीएनजीवर धावतात. या बससाठी ‘एमएनजीएल’कडून गॅस पुरवठा केला जातो.
पुणे : कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) चे आतापर्यंत थकित बील पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) दिले असून यापुढील पैसेही वेळेवर देण्याचे आश्वासन महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) ला सोमवारी दिले. मात्र, पैसे थकल्यानंतर पुन्हा गॅस पुरवठा बंदची टांगती तलवार ‘पीएमपी’वर राहणार आहे.
‘पीएमपी’च्या ताफ्यात सुमारे ११५० बस सीएनजीवर धावतात. या बससाठी ‘एमएनजीएल’कडून गॅस पुरवठा केला जातो. बसला दररोज सुमारे ६० हजार किलो गॅस लागतो. त्याचे दरदिवशी ३० लाख रुपये व महिन्याला सुमारे १० कोटी रुपये बिल होते. मात्र, मागील काही वर्षात पीएमपीकडून कंपनीला वेळेवर पैसे दिले नाहीत. त्यामुळे थकबाकी सुमारे ४७ कोटी रुपयांपर्यंत वाढत गेली. त्यामुळे व्याज व जीएसटीचे सुमारे २१ कोटी रुपयांचा समावेश आहे. यापार्श्वभुमीवर मागील आठवड्यात ‘एमएनजीएल’ने गॅस पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तातडीने हालचाली होऊन पीएमपीकडून २७ कोटी रुपये कंपनीला दिले. त्यामुळे गॅसपुरवठा बंदचा निर्णय मागे घेण्यात आला.
‘एमएनजीएल’कडून उचललेल्या टोकाच्या पावलामुळे पीएमपी प्रशासन आता खडबडून जागे झाले आहे. सोमवारी यावर चर्चा करण्यासाठी दोन्ही कंपन्यांतील वरिष्ठ अधिकाºयांची पीएमपी कार्यालयात बैठक झाली. पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, एमएनजीएलचे वाणिज्य संचालक संतोष सोनटक्के आदी या बैठकीला उपस्थित होते. सीएनजी बिलासह थकित रकमेवरील व्याज व जीएसटीवर चर्चा झाली. बिल न थकविता वेळेवर रक्कम देण्याचे आश्वासन कंपनीला देण्यात आले आहे. तसेच व्याज व जीएसटीवर वित्त विभागातील अधिकारी एकत्र बसून तोडगा काढणार आहेत. वेळेवर पैसे मिळाले नाहीत, तर त्याबाबत त्यावेळी निर्णय घेऊ, असे सोनटक्के यांनी सांगितले. नयना गुंडे यांनीही याला दुजोरा दिला.