भाऊरायाला दे आरोग्याचे दान, हेच बहिणीने मागितले वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:13 AM2021-08-23T04:13:26+5:302021-08-23T04:13:26+5:30
पुणे: बहीण अन् भावाचे अतूट नाते जपणारा असा एकमेव सण म्हणजेच रक्षाबंधन होय. अनोख्या नात्यात बहीण भावाला राखी बांधते. ...
पुणे: बहीण अन् भावाचे अतूट नाते जपणारा असा एकमेव सण म्हणजेच रक्षाबंधन होय. अनोख्या नात्यात बहीण भावाला राखी बांधते. तर भाऊ तिला नेहमी तुझ्यासोबत राहून रक्षण करण्याचे वचन देतो. असा रक्षाबंधनाचा सण शहरात उत्साहात साजरा झाला. कोरोनाच्या भीतीने प्रत्येक सणावर बंधने येत आहेत. त्याच्या प्रादुर्भावाने नागरिक भेटनेही टाळत आहेत. मागच्या वर्षी या महामारीने अनेकांनी भीतीपोटी ऑनलाइनच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. मात्र, यंदा कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे सकारात्मक चित्र सर्वत्र दिसत आहे. तसेच लसीकरण जोरदार सुरू असल्याने भाऊ-बहिणींनी एकमेकांच्या घरी जाऊन रक्षाबंधन साजरे केले आहे. शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसांत राखी पौर्णिमा आल्याने नागरिकांना सण उत्साहात साजरे करण्याची संधी मिळाली आहे. कालच शहरातील बाजारपेठेत असंख्य भगिनींनी राखी घेण्यासाठी गर्दी केली होती. बाजारात रंगीबेरंगी फुलांच्या, आकर्षक मणी, तसेच लहान मुलांसाठी कार्टूनच्या राख्या मिळत होत्या. आजही सुट्टीचा दिवस असल्याने सकाळपासूनच मिठाई, कपडे, सोनाराच्या दुकानात गर्दी दिसून आली. असंख्य भाऊ आपल्या बहिणीला गिफ्ट देण्यासाठी दुकानात घेऊन जात होते. बहिणीचा हट्ट, पसंत - नापसंत या नयनरम्य गोष्टीही या सणाच्या निमित्ताने दिसून आल्या.
कोरोना योद्धांना बांधली राखी
शहरात शालेय विद्यार्थिनीच्या हस्ते आरोग्य कर्मचारी, कचरा वेचक, पोलीस अशा कोरोना योद्धांना राखी बांधण्यात आली. राजकीय नेत्यांनीही आरोग्य कर्मचाऱ्यांसमवेत रक्षाबंधन साजरे केले. तसेच विविध सामाजिक संस्थांच्या वतीने पोलीस बांधवांना राखी बांधून सण साजरा करण्यात आला.
दुकानात आज विविध प्रकार
शहरातील मिठाईच्या दुकानात श्रीखंड, आम्रखंड, गुलाबजाम बरोबरच सुतरफनी, मलई बर्फी, रसगुल्ला, रसमलाई, विविध प्रकारचे लाडू, फराळाचे सर्व पदार्थ अशा सर्वच प्रकारच्या मिठाईला मागणी होती. तर बहिणीला खास देण्यासाठी सेलिब्रेशन सारखे गिफ्ट असंख्य बंधू घेताना दिसून आले.