दसऱ्याच्या मुहूर्तावर ग्राहकांनी लुटले खरेदीचे 'सोने'; पुण्यातील बाजारपेठांमध्ये उसळली गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 12:30 PM2020-10-27T12:30:15+5:302020-10-27T12:40:35+5:30
सहा महिन्यानंतर प्रथमच बाजारपेठांमध्ये उसळली गर्दी
पुणे : टाळेबंदी शिथिल केल्यानंतर ग्राहकांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर बाहेर पडत खरेदीचे सोने लुटले. दरवर्षीच्या तुलनेत सरासरी साठ ते सत्तर टक्के विक्री झाली असली तरी, सहा महिन्यानंतर प्रथमच शनिवारी आणि रविवारी बाजार पेठांमध्ये गर्दी उसळल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मिठाई आशा सर्वच दुकानांमध्ये ग्राहकांची पावले पडत होती.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टाळेबंदी (लॉकडाऊन) जाहीर करण्यात आले. जून महिन्यानंतर टाळेबंदीचे नियम मोठ्या प्रमाणावर शिथिल करण्यात आले. या काळात खरेदीच्या दृष्टीने महत्वाचे असलेले अक्षय्य तृतीया आणि गणेश उत्सव कोरडे गेले. दसऱ्याच्या मुहूर्तावर ग्राहक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले. त्यामुळे व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
पूना इलेक्ट्रॉनिक हायर पर्चेस असोसिएशनचे अध्यक्ष मिठालाल जैन म्हणाले, दरवर्षीच्या तुलनेत यंदा दसऱ्याला ६० टक्के विक्री झाली. रविवारी दुपार नंतर ग्राहक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मायक्रो वेव्ह, फूड प्रोसेसर, मिक्सर, टोस्टर या उपकरणांना चांगली मागणी होती. यंदा केकची क्रिम अथवा लोणी फेटण्यासाठी लागणाऱ्या बिटरला खूप मागणी होती.
दरवर्षीच्या तुलनेत सुवर्ण बाजारात साठ ते सत्तर टक्के उलाढाल झाली. कमी वजनाचे सुवर्ण अलंकार, हिऱ्यांचे दागिने, नाणी, सोन्याची वेढणी, कर्णफुल, सोनसाखळी यांना मागणी होती. सोन्यामध्ये १ ते १५ ग्रॅम आणि हिऱ्यांमध्ये एक ते दीड लाख रुपये किंमतीच्या आभूषणांना मागणी होती. सोन्याचा प्रति तोळा भाव ५२ ते ५३ हजार आणि चांदीचा किलोचा भाव ६३ हजार रुपये असल्याची माहिती सराफ वास्तुपाल रांका यांनी दिली.
दरवर्षीच्या दसऱ्याच्या तुलनेत ५० ते ५५ टक्के गिऱ्हाईक झाले. शनिवारी रात्री पाऊस झाल्याने खरेदीला काहीसा फटका बसला. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर प्रथमच इतकी गर्दी झाल्याचे मिठाई आणि फरसाण असोसिएशनचे कार्याध्यक्ष श्रीकृष्ण चितळे यांनी सांगितले.
.....
बिटर, मोबाईल, लॅपटॉपची मागणी वाढली
टाळेबंदी काळात घरीच केक अथवा इतर पदार्थ करण्याची सवय लागल्याने बिटरला चांगली मागणी होती. मोबाईल आणि लॅपटॉपच्या मागणीत दीड पटीने वाढ झाली आहे. मुलाचे ई शिक्षण आणि घरून काम करण्याच्या पद्धतीमुळे या उपकरणांना मागणी वाढल्याचे पूना इलेक्ट्रॉनिक हायर पर्चेस असोसिएशनचे अध्यक्ष मिठालाल जैन यांनी सांगितले.