नीरा : विवाह सोहळ्यात हळदीच्या कार्यक्रमादरम्यान नवरदेवाच्या खोलीतून सोन्याचांदीचे दागिने लंपास केले. ही घटना नीरा जवळील पाडेगाव (ता. खंडाळा) येथील जय दुर्गा मंगल कार्यालयात सोमवारी दुपारी घडली. चोरट्यांनी एकूण दीड लाखांचा ऐवज लांबविला आहे. राहुल हणुमंत वाघ (रा.वीर, ता.पुरंदर) यांनी लोणंद पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेवसे व वाघ या कुटुंबातील वधुवरांचा विवाह सोहळा सोमवारी होता. साखरपुडा झाल्यानंतर वर पक्षातील वाघ कुटुंबातील सर्व महिला हळद लावण्यासाठी कार्यालयाच्या सभागृहात गेल्या. त्यांच्यातील एक आजीबाई खोलीतच होत्या. त्यावेळी अज्ञात महिला खोलीत आली. आजींना पाहुणी असल्याचे सांगत शंभर रुपयांचा आहेर दिला. गरोदर असल्याची बतावणी करीत पाय-या चढायला डॉक्टरांनी मनाई केल्याचे सांगत ती खोलीमध्ये बसली. हळद खेळायला पाठविलेल्या आजी परत येईपर्यंत या महिलेने खोलीतील वस्तू अस्ताव्यस्त करून सोने, चांदी व मोत्याचे दागिने असलेली पिशवी घेऊन पोबारा केला. पिशवीमध्ये सोनसाखळी, मणि मंगळसूत्र, कानातले झुबे, चांदीचे पैंजण, मोत्याची नथ असा दीड लाखांचा ऐवज होता. सर्व महिला परत आल्यावर दागिने गायब असल्याचे लक्षात आले.
हळदीच्या कार्यक्रमातून सोन्याचांदीचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 9:52 PM
नेवसे व वाघ या कुटुंबातील वधुवरांचा विवाह सोहळा सोमवारी होता. साखरपुडा झाल्यानंतर वर पक्षातील सर्व महिला हळद लावण्यासाठी कार्यालयाच्या सभागृहात गेल्या.
ठळक मुद्देपिशवीमध्ये सोनसाखळी, मणि मंगळसूत्र, असा दीड लाखांचा ऐवज