इंदापूर येथे पॉलिशच्या बहाण्याने साडेपाच तोळे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 06:46 PM2018-03-06T18:46:19+5:302018-03-06T18:46:19+5:30
पुणे: सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देतो असे सांगून मदनवाडी (ता. इंदापूर) गावच्या हद्दीतील देवकातेवस्ती येथे हात चलाखीने महिलांकडून दोन चोरांनी सुमारे साडेपाच तोळे सोन्याचे एक लाख सदोतीस हजार पाचशे रुपये किमतीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
पुणे: सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देतो असे सांगून मदनवाडी (ता. इंदापूर) गावच्या हद्दीतील देवकातेवस्ती येथे हात चलाखीने महिलांकडून दोन चोरांनी सुमारे साडेपाच तोळे सोन्याचे एक लाख सदवतीस हजार पाचशे रुपये किमतीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा फसवणुकीचा प्रकार मंगळवारी (दि, ६) सकाळी अकराच्या सुमारास घडला. सराफ दुकानात मजुरी जादा लागते आणि आम्ही आपल्या नजरे समोरच दागिने नवे करुन देतो असे सांगून दागिन्यांची चोरी केली आहे. समाजात अशाच प्रकारे अनेक ठिकाणी महिलांची फसवणूक करण्यात येत असूनही महिला सावधानता बाळगत नसल्याचे अशा घटनांमधून निदर्शनास येत आहे.
याबाबत विश्वास रंगनाथ देवकाते (रा. मदनवाडी ता. इंदापूर जि. पुणे) यांनी भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सकाळी अकराच्या सुमारास दोन अनोळखी इसमांनी घरी येवून घरातील महिलांना सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो असे सांगून बोरमाळ, गंठन, दोन फुले, सोन्याची अंगठी, आणि मंगळसुत्राच्या दोन वाट्या असे एकूण दागिन्यांची चोरी केली. देवकाते यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास भिगवणचे पोलीस उपनिरीक्षक बी. एन पवार, पोलीस शिपाई सी. सी भागवत करत आहे.