चांगल्या वाईटाची ’सेन्सॉरशिप’ करता आली पाहिजे : जावेद सिद्दीकी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 06:17 PM2020-02-01T18:17:37+5:302020-02-01T18:18:28+5:30
इंटरनेट, वेब सिरीजवरची भाषा त्या ठिकाणी योग्यच आहे. पण त्याचा दर्जा घसरून चालणार नाही...
पुणे : लेखन हे सर्वसामान्य आणि अभिरूचीसंपन्न वाचक या दोहोंसाठी असावं. मात्र जे लिहिलं जाईल ते चांगलंच असलं पाहिजे. लेखनाचा दर्जा ढासळता कामा नये. आपल्याला स्वत:लाच चांगल्या -वाईटाची सेन्सॉरशिप करता आली पाहिजे. त्यासाठी वेगळी समिती असली तरच ऐकू, असे वाटता कामा नये. वृत्तवाहिन्यांवरच्या चर्चांमधील व्यक्ती एकमेकांचे ऐकू शकत नाहीत, तर, आपण ते कसे ऐकू शकणार ? असा सवाल ज्येष्ठ संवाद लेखक जावेद सिद्दीकी यांनी उपस्थित केला.
डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हल मध्ये ' समाजाची बदलती भाषा ' या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यामध्ये पत्रकार विजय चोरमारे, सचिन चपळगावकर, अॅड. सुजाता पाठक, शॉर्ट फिल्म दिग्दर्शक श्रावण खरात सहभागी झाले होते.
सिद्दीकी म्हणाले, ' भाषा बदलत आहे, पण ती अशीच बदलली पाहिजे का ? याचा विचार केला पाहिजे. म्हणी, वाक्प्रचार, जुन्या कथाची पखरण असलेली भाषा आपण विसरलो आहोत. एसएमएस ची नवीच भाषा जन्माला आली आहे. इंटरनेट, वेब सिरीजवरची भाषा त्या ठिकाणी योग्यच आहे. पण त्याचा दर्जा घसरून चालणार नाही. सतत बदलली जाणारी भाषा जपलीच पाहिजे पण कंटेट सांभाळणे जास्त आवश्यक आहे. 'आपल्या भाषेवर इतिहास, भूगोलाची छाप असते. भाषा बदलत गेली तरी लेखकाची जबाबदारी बदलत नाही. भाषांना वाचविण्याची जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागेल.
चपळगावकर यांनी समाज माध्यमांची,राजकारण्यांची भाषा ही प्रभाव टाकत असते. टीआरपीची भाषा ही समाज संस्कृती जपणारी नसल्याकडे लक्ष वेधले. सुजाता पाठक म्हणाल्या, ' नाटकांची वाक्ये आता पल्लेदार नसतात, तर तुटक असतात. समाजाचेच प्रतिबिंब नाटकात पडत असते.
श्रावण खरात यांनी 'इंटरनेट वर चित्रपट करताना बंधने नसली, तरी स्वत:वर स्वत:ची बंधने घालून घेणे हितकारक ठरत असल्याचे नमूद केले.
संयोजक मोनिका सिंग यांनी सर्वांचा सत्कार केला. आर जे तरुण यांनी सूत्रसंचालन केले.
----------------------------------------------------------------------