पुणे: 'वर्क फ्रॉम होम'च्या आमिषाने डॉक्टरची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. ऑनलाइन टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका डाॅक्टरची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पार्वती परिसरात राहणाऱ्या एका ६९ वर्षीय डाॅक्टरने पोलिसांना ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार यांचा पर्वती दर्शन परिसरात दवाखाना आहे. ते पिंपरी-चिंचवड परिसरात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी डाॅक्टरच्या मोबाइलवर अनोळखी क्रमांकावरून मेसेज पाठवला. ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी, एका बड्या कंपनीत अर्धवेळ कामाची संधी असून घरबसल्या चांगले पैसे मिळतील, असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना एका बँक खात्यात नोंदणीसाठी दोन हजार रुपये पाठवायला सांगितले. कंपनीकडून लॅपटाॅप, मोबाइल संच, सीमकार्ड विमाानाने पाठविण्यात येणार आहे, असे सांगून चोरट्यांनी त्यांना आणखी पैसे बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. तक्रारदार यांनी चोरट्यांच्या बँक खात्यात एकूण मिळून ३२ हजार ५० रुपये पाठवले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.