पुणे : यंदा अवकाळी व वळवाच्या पावसाने राज्याला हैराण करून सोडले आहे. कधी नव्हे ते या उन्हाळ्यात उन्हाऐवजी पावसाळाच अधिक अनुभवायला मिळत आहे. येत्या मान्सूनमध्ये अल निनो सक्रिय होणार असून, त्याचा पावसावर काही प्रभाव पडणार नाही. अल निनो असतानाही भारतात पाऊस पडलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी व सामान्य नागरिकांनीही मान्सूनबाबत घाबरून जाण्याची गरज नाही, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.
सध्या उन्हाळ्यात पाऊस पडत असल्याने पावसाळ्यात पाऊस पडणार की नाही? याबाबत नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. परंतु, अवकाळी व वळवाच्या पावसाचा आणि मान्सूनच्या पावसाचा काहीही संबंध नसतो. त्यामुळे यंदा भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, ९६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. या महिनाअखेर अजून सुधारित अहवाल हवामानशास्त्र विभाग जाहीर करणार आहे. त्यावर पावसाचा नक्की अंदाज समजणार आहे. अल निनोचा प्रभाव असतानाही यापूर्वी चांगला पाऊस झाल्याचे निरीक्षण आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा घेणार, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा दावा
यामुळे बेमोसमी पाऊस
उन्हाळ्यामध्ये कडक उन्हाने जमीन खूप तापत असते. चक्रीय वात स्थिती निर्माण होते आणि बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे तापलेल्या जमिनीवर ढग तयार होतात आणि मग पाऊस पडतो. त्याला अवकाळी अथवा वळीव म्हटले जाते. दरवर्षी उन्हाळ्यात असा पाऊस पडणे नॉर्मल आहे.
परिणाम कशामुळे?
अल निनोची तीव्रता आणि मान्सूनचा काळ यावर बरेच अवलंबून असते. अल निनो निर्माण होण्याची वेळ, त्याची पोझिशन आणि त्याची तीव्रता यावरून मान्सूनवर त्याचा काय प्रभाव असेल? याचा अंदाज बांधता येतो. अल निनोशिवाय हिंदी महासागरातील तापमान, उष्णकटीबंधीय प्रदेशातील स्थानिक हवामान यांचाही मान्सूनवर परिणाम होतो. सध्या हिंदी महासागरातील तापमान सर्वसाधारण असल्याचे एन्सो बुलेटिनमध्ये सांगण्यात आले आहे.