BSNL च्या ग्राहकांसाठी खुशखबर; थेट पुण्यात ६ टॉवरवरून ४ जी सेवा; ऑगस्टअखेर होणार शतक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 02:12 PM2024-05-17T14:12:32+5:302024-05-17T14:12:58+5:30
अनेकांनी BSNL अन्य कंपन्यांकडे पोर्ट केले होते, आता ४ जी सेवा उपलब्ध होणार असल्याने ग्राहक पुन्हा BSNL कडे वळतील
नितीन चौधरी
पुणे : भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलने पुण्यात प्रायोगिक तत्त्वावर सहा टॉवरवरून मोबाइलची ४ जी सेवा उपलब्ध करून दिली आहे. ऑगस्टपर्यंत शहरातील १०० टॉवरवरून ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती प्रधान सरव्यवस्थापक अनिल धानोरकर यांनी दिली. जागतिक दूरसंचार दिनाच्या पार्श्वभूमीवर बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी ही खुशखबर आहे.
बीएसएनएलकडून आतापर्यंत २ जी सेवा पुरवण्यात येत आहे. मात्र, खासगी कंपन्या ४ जी तसेच ५ जी सेवादेखील उपलब्ध करून देत असल्याने बीएसएनएल टीकेचे धनी ठरत होते. मात्र बीएसएनएलने देखील ४ जी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी चंग बांधला आहे. पुण्यात ४ जी सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू केल्याची माहिती धानोरकर यांनी दिली.
पुणे शहरात बीएसएनएलचे सुमारे ५५०, तर ग्रामीण भागात ३५० असे एकूण ९०० टॉवर उभारण्यात आले आहेत. या टॉवरवरून सध्या बीएसएनएलची २ जी मोबाइल सेवा पुरविण्यात येत आहे. ४ जी आणि ५ जीच्या जमान्यात बीएसएनएल टू जी सेवा पुरवित होती. आता शहरातील ६ टॉवरवरून ४ जी सेवा देण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्व ९५० टॉवरवरील सेवा कार्यान्वित होण्यासाठी महत्त्वाचे असलेले एक मुख्य उपकरण येत्या जूनमध्ये शहरात दाखल होणार असून, त्याचे कार्य सुरू झाल्यानंतर ऑगस्टमध्ये पहिल्या शंभर टॉवरवरून ४ जीची सेवा देण्यात येणार आहे. बीएसएनएलच्या सध्याच्या टॉवरवरूनच ही ४ जी सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे मुख्य उपकरण पुण्याखेरीज छत्तीसगड, गुजरात तसेच मध्य प्रदेशातही बसविले जाणार आहे.
साधारण डिसेंबर अखेरीस शहरात बीएसएनएलच्या बहुतांश टॉवरवरून ४ जी सेवा उपलब्ध करून देणार आहे. केवळ २ जी सेवा मिळत असल्याने अनेकांनी बीएसएनएलचे मोबाइल क्रमांक अन्य कंपन्यांकडे पोर्ट केले होते. आता ४ जी सेवा उपलब्ध होणार असल्याने बीएसएनएलकडे ग्राहक पुन्हा वळतील, अशी आशा आहे. - अनिल धानोरकर, प्रधान सरव्यवस्थापक, बीएसएनएल