पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! धरण परिसरात मुसळधार; शहरावरील पाणी कपात टळली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 07:50 PM2022-07-22T19:50:30+5:302022-07-22T19:53:23+5:30
२६ जुलैनंतर पाणीपुरवठा नेहमीप्रमाणे होणार
पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण परिसरात झालेल्या समाधानकारक पावसामुळे धरणे ६९ टक्क्यांपेक्षा अधिक भरली असल्याने, २६ जुलैनंतरही पाणीपुरवठा नेहमीप्रमाणे होणार आहे. तूर्तात तरी शहरात कोणतीही पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात येणार नसल्याचे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरूध्द पावसकर यांनी दिली.
दरम्यान भविष्यात होणारा पाऊस व धरणांमधील पाणीसाठा विचारात घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामधील पाणी साठा कमी झाल्याने, पुणे महापालिकेने ४ ते ११ जुलै दरम्यान एक दिवसा आड पाणी पुरवठय़ाचे वेळापत्रक जाहीर केले होते. मात्र १० तारखेला असलेल्या आषाढी एकादशी आणि बकरी ईद विचारात घेता दिनांक ८ ते ११ जुलैपर्यंत दररोज पाणी पुरवठा नियमितपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर ११ जुलै रोजी चारही धरणांमधील पाणीपुरवठा लक्षात घेता पुढील पाणीकपातही रद्द करण्यात आली होती व २६ जुलैपर्यंत दररोज पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे जाहिर केले होते.
२६ जुलै रोजी धरणात पाणीसाठा व पाऊस पाहून पाणीकपातीबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल असे महापालिकेने सांगितले होते. मात्र २२ जुलै रोजीच महापालिकेने संभाव्य पाणीकपात होणार नसल्याचे जाहिर केल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
धरणातील पाणी साठा(२२ जुलै रोजी सायंकाळी पाचपर्यंत)-
- खडकवासला - (१.९४ टीएमसी) टक्केवारी ९८.४०
- पानशेत- (७.६० टीएमसी) टक्केवारी ७१.३७
- वरसगाव- ( ८.४२ टीएमसी) टक्केवारी ६५.६६
- टेमघर- ( २.०७ टीएमसी ) टक्केवारी ५५.९७
४ धरणांमधील एकूण साठा :- २०.०३ टीएमसी, टक्केवारी ६८.७३ टक्के.
२२ जुलै रोजी गेल्यावर्षीचा पाणीसाठा :- १४.२३ टीएमसी, टक्केवारी ४८.८४