चांगला अनुवाद म्हणजे अनुसर्जनच : सविता दामले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 07:00 AM2020-03-08T07:00:00+5:302020-03-08T07:00:05+5:30
अनुवाद म्हणजे परकायाप्रवेश
प्रज्ञा केळकर-सिंग-
सविता दामले यांनी मेलिंडा गेट्स लिखित ‘द मोमेंट ऑफ लिफ्ट’ या पुस्तकाचा मराठीमध्ये अनुवाद केला आहे. याआधी त्यांची ३० हून अधिक अनुवादित पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अनुवादाच्या प्रक्रियेनिमित्त ‘लोकमत’ प्रतिनिधीने दामले यांच्याशी साधलेला संवाद...
मेलिंडा गेट्स यांच्या पुस्तकाच्या अनुवादाचा अनुभव कसा होता?
ल्ल मेलिंडा गेट्स या बिल गेट्स यांच्या पत्नी. मायक्रोसॉफ्टमध्ये त्या पतीच्या बरोबरीने मदत करीत होत्या. मुलांची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी घरावर लक्ष केंद्रित केले. मुलगी दोन वर्षांची झाल्यावर त्यांनी आईच्या पावलावर पाऊल ठेवून सामाजिक कार्याला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी खूप प्रवास केला, अनेकांना भेटल्या. प्रवासात भेटलेली माणसे, त्यांच्याकडून शिकायला मिळालेल्या गोष्टी याबद्दल त्यांनी पुस्तकातून बरेच काही लिहिले आहे. त्यांनी जगभरातील स्त्रियांबद्दलचे अनुभव पुस्तकात नमूद केले आहेत. लोकसंख्येमध्ये स्त्रियांची संख्या अर्धी असूनही शिक्षण, लग्न, नोकरी, मूल याबाबतचे निर्णय बऱ्याच देशांमध्ये घेण्याचे स्वातंत्र्य त्यांना नाही. ज्या देशात स्त्रीला दडपले जाते त्या देशाची प्रगती होऊ शकत नाही, अशा आशयाचे विचार त्यांनी मांडले आहेत. अनुवाद करताना त्यांच्या अनुभवांनी मलाही बरेच काही शिकवले, समृद्ध केले.
तुम्ही अनुवादाच्या क्षेत्राकडे कशा वळलात?
ल्ल मला लहानपणापासूनच लेखनाची आवड होती. दहावीनंतर कॉमर्स शाखेला प्रवेश घेतला आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्टेट बँकेत नोकरीही लागली. १९९२-९३च्या दरम्यान राज्य मराठी विकास संस्थेने नोबेल पुरस्कारविजेत्या लेखकांचे साहित्य मराठीत अनुवादित करण्याचा प्रकल्प हाती घेतला आणि नवोदितांना स्वत:हून कोणत्याही लेखकाच्या पुस्तकातील २० पानांचा अनुवाद करून पाठविण्यास सांगितले. मी ‘पर्ल बर्ग’ या लेखिकेचा अनुवाद करून पाठविला. काही दिवसांनी मला बोलावून घेण्यात आले आणि माझी या प्रकल्पासाठी निवडही झाली. तेव्हापासून अनुवादावर प्रेमच जडले.
अनुवादाकडे कोणत्या दृष्टीने पाहायला हवे?
अनुवाद म्हणजे परकायाप्रवेश असतो. प्रत्येक लेखकाचा बाज वेगळा असतो. प्रत्येक भाषेचे रूप, बाज, आकलन वेगवेगळे असते. अनुवादकाने आधी उत्तम लेखक असले पाहिजे. दोन्ही भाषांमधील बारकावे अवगत असले पाहिजेत. शब्दाला शब्द भाषांतरित करणे म्हणजे अनुवाद नव्हे. कुठलीही भाषा ही माणसांशी संबंधित असते. भाषेतून ती संस्कृती व्यक्त होते. त्यामुळे अनुवादकाला केवळ शब्दाला शब्द देऊन ते लेखन नवीन भाषेत आणायचे नसते; तर त्याला त्या भाषेतील माणसे आणि त्या भाषेचा सांस्कृतिक अवकाश आपल्या भाषेत आणायचा असतो. चांगला अनुवाद हे अनुसर्जनच असते.