कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणात गुडविन ज्वेलर्सच्या संचालक भावांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:12 AM2021-03-24T04:12:13+5:302021-03-24T04:12:13+5:30
पुणे : जादा परतावा देण्याचा बहाणा करुन कोट्यवधीची फसवणूक केल्याप्रकरणात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुडविन ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक ...
पुणे : जादा परतावा देण्याचा बहाणा करुन कोट्यवधीची फसवणूक केल्याप्रकरणात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुडविन ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक असलेल्या दोघा बंधुंना अटक केली.
सुनीलकुमार मोहनन अक्काराकरन आणि सुधीरकुमार मोहनन अक्काराकरन (रा. डोंबिवली, मुळ रा. चिरुर, पो़ थिरुर, केरळ) अशी त्यांची नावे आहेत. दोघांनाही आज न्यायालयात हजर केले असता त्यांना २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.
याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात आशा गायकवाड (वय ४५) यांनी फिर्याद दिली होती. या दोघांविरुद्ध ठाणे, अंबरनाथ, डोंबिवली, पुणेसह ६ ठिकाणी २०१९ मध्ये गुन्हे दाखल केले होते.
दोघांनी गुडविल ज्वेलर्स दुकान विविध शहरांमध्ये सुरु केले होते. स्कीम, भिशी तसेच ठेवींमध्ये पैसे गुंतवल्यास अधिक परतावा देण्याच्या बहाण्याने त्यांनी लोकांकडून मोठ्या प्रमाणावर ठेवी घेतल्या होत्या. २०१९ मध्ये ऐन दिवाळीत त्यांनी आपल्या शोरूम बंद करुन पोबारा केला होता. या दोघांनी जवळपास १५०० गुंतवणूकदारांची २५ कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केली होती. ठाणे पोलिसांनी त्यांची मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरु केल्यावर ते डिसेंबर २०१९ मध्ये ठाणे न्यायालयात शरण आले होते. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी त्यांना न्यायालयातून कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात वर्ग करुन अटक केली.