पुणे : भारती विद्यापीठ पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुंड विशाल शिवाजी शेळके (वय २०, रा. भोलेनगर, आंबेगाव खुर्द) याला पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी एमपीडीए कायद्यानुसार येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
शेळके हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव एकत्र करणे, घातक हत्यारे बाळगणे, दरोडा, जबरी चोरी, अपहरण, मालमत्तेचे नुकसान करणे असे ३ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे यापूर्वी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, तरी देखील त्याच्या गुन्हेगारी कृत्यावर आळा बसला नाही.
शेळके याची परिसरात मोठी दहशत असल्याने त्याच्या विरुद्ध कोणी तक्रार देण्यास समोर येत नव्हते. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी शेळके याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त गुप्ता यांना सादर केला होता. त्यानी प्रस्तावाचे अवलोकन करून शेळके याला मध्यवर्ती कारागृह येरवडा येथे स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.