गुंडांना गावठी पिस्तूल विकायला आला, पोलिसांनी बेड्या ठोकल्या
By विवेक भुसे | Published: December 19, 2023 08:09 PM2023-12-19T20:09:33+5:302023-12-19T20:09:54+5:30
७ पिस्तुलांसह २४ काडतुसे जप्त : नव वर्षाच्या पार्श्वभूमीवर कोंढवा पोलिसांची कारवाई
पुणे : गावठी पिस्तुलांची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या गुंडांना कोंढवा पोलिसांनी पकडले. ही कारवाई बोपदेव घाट परिसरात करण्यात आली. गुंडांकडून सात गावठी पिस्तुले, २४ काडतुसे जप्त करण्यात आली. पोलिसांच्या पथकाने जळगाव परिसरातून गुंडांना पिस्तूले पुरविणाऱ्या एकास अटक केली.
संदेश उर्फ संजय अंकुश जाधव (वय ३२, रा. गोकुळ हाऊसिंग सोसायटी, मोरे वस्ती, चिखली), शिवाजी उर्फ शिवा भाऊ कुडेकर (वय ३४, रा. वाशेरे, ता. खेड), राहुल नानसिंग लिंगवाले अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
तपास पथक गस्त घालत असताना पोलिस हवालदार विशाल मेमाणे यांना बोपदेव घाटात दोघे जण काही दिवसांपासून कमरेला पिस्तुल लावून फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गारवा हॉटेलजवळ पोलिस पथक वेषांतर करुन थांबले. मिळालेल्या माहितीनुसार वडाफच्या गाडीतून दोघे जण तेथे आले. पोलिस पथकाने त्यांच्यावर झडप घालून पकडले. दोघांकडे प्रत्येकी एक पिस्तुल व काडतुसे आढळून असल्याचे पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी सांगितले.
महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील उमराटी गावातून ओंकार बर्नाला याच्याकडून पिस्तुले खरेदी केल्याची त्यांनी कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी यांच्या माध्यमातून बर्नालाशी संपर्क साधून २ पिस्तूल आणि १० काडतुसांची मागणी केली. पोलिस पथक चोपडा येथे पोहचले. बर्नालाने त्याचा साथीदार लिंगवाले याला हत्यारे घेऊन पाठविले. पोलिसांनी ग्रामस्थांप्रमाणे वेशभूषा केली होती. पोलिसांनी लिंगवालेला पकडले. त्याच्याकडून २ पिस्तूल आणि १० काडतुसे जप्त करण्यात आली. हे पाहून काही अंतरावर थांबलेला बर्नाला पसार झाला.
पोलीस उपायुक्त आर. राजा, सहायक आयुक्त शाहूराजे साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, निरीक्षक संदीप भोसले, संजय मोगले, सहायक निरीक्षक दिनेश पाटील, लेखाजी शिंदे, विशाल मेमाणे, सतीश चव्हाण, निलेश देसाई, लवेश शिंदे, शाहीद शेख, लक्ष्मण होळकर, संतोष बनसुडे यांनी ही कामगिरी केली.
दोघेही सराईत
संदेश जाधव, शिवाजी कुडेकर हे दोघेही सराइत गुन्हेगार आहेत. संदेशविरुद्ध चिखली, देहूरोड, वडगाव मावळ, चिखली, भोसरी पोलीस ठाण्यात ३२ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचा साथीदार शिवाजी याच्याविरुद्ध खून, लूट असे गंभीर स्वरुपाचे तीन गुन्हे दाखल आहेत.