पुणे : आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका अभियंत्याचा दीड वर्षांपूर्वी अपघातातमृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना रविवारी (दि.1) झालेल्या लोक अदालतीमध्ये तब्बल १ कोटी ४४ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळाली. लोक अदालतीत विमा कंपनीचे अधिकारी दीपेश कोत्तावार यांनी मृत व्यक्तीचे वय आणि भविष्यातील पगारवाढ याचा विचार करून इतक्या रकमेची नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले. त्यानंतर हा दावा निकाली काढण्यात आला. यंदाच्या लोक अदालतमध्ये मंजूर झालेली ही सर्वात मोठ्या रकमेची नुकसान भरपाई आहे.
खराडीतील आयटी कंपनीत वरिष्ठ क्वालिटी इंजिनिअर पदावर ते कार्यरत होते. त्यांना दरमहा ९५ हजार रुपये पगार होता. २० सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी कंपनीचे कामकाज आटोपून ते लोहगाव येथील घरी निघाले होते. त्यावेळी समोरून भरधाव वेगाने येणा-या ट्रान्झिट मिक्सर ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी संबंधित ट्रकचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला होता. मृत व्यक्तीचे वारस पत्नी, लहान मुलगा आणि आईने अॅड. अनिल पटनी व अॅड. आशिष पटनी यांच्यामार्फत डिसेंबर २०१९ मध्ये मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांच्या न्यायालयात नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला. आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनी आणि ट्रक मालकाविरोधात हा दावा दाखल करण्यात आला होता. लोकअदालतीत हा दावा निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आला होता. विमा कंपनीच्या वतीने अॅड. हृषीकेश गानू यांनी काम पाहिले.