राज्यातील १४ किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी शासनाने १२८ कोटी रुपयांची विकासकामे : तावडे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 04:33 PM2018-02-19T16:33:47+5:302018-02-19T16:34:08+5:30
राज्यातील १४ किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी शासनाने १२८ कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत
जुन्नर : रयतेचे राजे छत्रपती शिवरायांचा इतिहास ढाल तलवारीच्या पात्याचाच फक्त इतिहास नव्हता तर शिवराय उत्तम प्रशासक होते. त्यांच्या राज्य कारभाराची , प्रशासनाची माहिती नवीन पिढीला व्हावी यासाठी शालेय अभ्यासक्रमात ‘शिवाजी मॅनेजमेंट गुरू’ याची माहिती समाविष्ट करण्यात आली. राज्यातील १४ किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी शासनाने १२८ कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केले.
मुख्यमंत्र्यांचे प्रस्थान झाल्यानंतर शिवकुंज स्मरकासमोर मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेत ते बोलत होते. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, आमदार शरद सोनवणे, मराठा सेवा संघाचे वतीने जिल्हाध्यक्ष राजेंद्र कुंजीर,विठ्ठल जाधव, मारुती सातपुते, तालुकाध्यक्ष सुनील ढोबळे, शहरअध्यक्ष राजेंद्र बुट्टे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मराठा सेवा संघाच्या वतीने देण्यात येणारा पुरस्कार आंतरराष्ट्रीय जलतरणपट्टू रोहन मोरे यांना विनोद तावडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी पोलीस दलाच्या बँड पथकाच्या वतीने छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली. शिवजयंतीच्या औचित्याने शालेय विद्यार्थ्यांनी मल्लखांबाचे प्रात्यशिक सादर करण्यात आली. किल्ले शिवनेरीवर शिवज्योत नेण्यासाठी शिवप्रेमी युवकांची रात्रीपासून मोठी गर्दी होती. त्यांचे स्वागत जुन्नर नगर पालिकेच्या वतीने करण्यात आले.पर्यटनमंत्री जयप्रकाश रावळ यांनी आपल्या सहक-यांसह पायी चालत येऊन शिवनेरी संवर्धनाच्या कामांची पाहणी केली. गडावर नियमित स्वछता असते का शिवजयंतीच्या निमित्ताने करण्यात आली याची विचारणा त्यांनी यावेळी केली.