पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या एक महिन्यांपासून ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होता. अखेर या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. पुणे जिल्ह्यातील 748 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तर शिवसेना - भाजपाने पण आपले गड राखतच अनेक ठिकाणी बाजी मारली आहे. तर मावळ तालुक्यात काटे की टक्कर झालेल्या झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने विजयी परंपरा कायम राखली आहे . दरम्यान, जुन्नर तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या आतुर ग्रामपंचायतीत हातातून गेली आहे. नक्की कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या हे सरपंच पदाच्या निवडणुकीनंतर स्पष्ट होईल.
पुणे जिल्ह्यात डिसेंबर अखेर पर्यंत मुदत संपलेल्या सर्व ग्रामपंचायतींच्या राज्य निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणूक जाहीर केल्या. यात जिल्ह्यात 748 ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यातील 95 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर 649 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारी रोजी मतदान झाले. त्याचा निकाल सोमवारी लागला.यात अनेक धक्कादायक निकाल देखील लागले आहेत. यात शिरुरचे आमदार आशोक पवार यांचे त्याच्या वडगाव रासाई गावातील पॅनलाचा दारूण पराभव झाला. तर दौंड तालुक्यातील पाटस ग्रामपंचायती जिल्हा परिषदेच्या विद्यमान समाजकल्याण सभापती सारीका पानसरे यांचे पती राजेंद्र पानसरे यांचा विरोध झाला.
जुन्नर तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या आतुर ग्रामपंचायतीत हातातून गेली आहे.
खेड तालुक्यातील आंबोली गावात माजी सभापती सुरेश शिंदे यांच्या पॅनलचा देखील पराभव झाला. शिरूर तालुक्यात शिक्रापूर ग्रामपंचायत निवडणुकीत माजी बांधकाम सभापती मंगलदास बादल यांच्या पॅनलला, पुरंदर तालुक्यातील नीरा ग्रामपंचायतीत माजी जिल्हा परिषद सभापती दत्ता चव्हाण यांचा स्वत:चा पराभव झाला. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय कोलते यांचे बंधू संभाजी कोलते यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान, जिल्ह्यात बहुतेक आमदारांनी ग्रामपंचायत निवडणुकीत आपले वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला आहे.
आंबेगाव तालुक्यात मंचर ग्रामपंचायतीसह शिवसेने निम्म्या जागा मिळविल्या आहेत. येथे राष्ट्रवादीला देखील चांगले यश मिळाले आहे. जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असले तरी शिवसेनेने आपल्या जागा राखल्या आहेत.
खेड तालुक्यात माजी आमदार सुरेश गोरे यांच्यानंतर पक्षा पोकळी निर्माण झाली असली तरी अनेक ग्रामपंचायतीत गोरे यांचे फोटो लावून निवडणुका लढविण्यात आल्या. एकूण जागांचा विचार केला तर आमदार दिलीप मोहिती यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. येथे भाजपचे शरद बुट्टे पाटील व अतुल देशमुख यांनी देखील जोर लावत काही ग्रामपंचायतीत भाजपचा झेंडा फडकविला आहे.
शिरूर तालुक्यात आमदार पवार यांना स्वत: च्या गावात पराभव झाला असला तरी अनेक ग्रामपंचायती राखण्यात यश आले आहे. येथे भाजप- शिवसेनेला देखील चांगल्या जागा मिळाल्या आहेत.
मावळ तालुक्यात राष्ट्रवादीपेक्षा भाजपला अधिक जागा मिळाल्या असून, महाआघाडीला अधिक जागा मिळाल्याचा दावा केला जात आहे.
भोर तालुक्यात आमदार संग्राम थोपटे यांनी गड राखला आहे.
पुरंदर तालुक्यात आमदारांना धक्का बसला असून, शिवसेनेचे वर्चस्व कायम ठेवले आहे.
दौंड तालुक्यात राष्ट्रवादी व भाजपला समसमान जागा मिळाल्या आहेत.
इंदापूर तालुक्यात राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांना देखील चांगले यश मिळाले आहे. तर बारामती तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व कायम आहे.