आजोबा आणि ४ वर्षांच्या नातीला मण्यारचा दंश; दोघांची प्रकृती गंभीर, डॉक्टर ठरले देवदूत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 11:24 AM2023-08-08T11:24:39+5:302023-08-08T11:25:01+5:30
डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेली ४ दिवस अहोरात्र प्रयत्न करून आजोबा आणि नातीचा जीव वाचविला
खोडद : अतिविषारी सापांमध्ये गणल्या जाणाऱ्या मण्यार सापाच्या दंशाने अत्यवस्थ झालेल्या आजोबा आणि नातीसाठी नारायणगाव येथील डॉ.सदानंद राऊत हे देवदूत ठरले. अत्यवस्थ झालेल्या दोघांचाही जीव वाचविण्यात डॉ.राऊत यांना नुकतेच यश आले.
ओझर येथील शेतकरी अशोक जगदाळे (वय ५२) व त्यांची नात अनन्या जगदाळे (वय ४वर्षे) या दोघांनाही मण्यार या अतिविषारी सर्पाने दंश केल्याची घटना बुधवारी ३ ऑगस्ट रोजी रात्री १२:३० च्या सुमारास घडली होती.
मण्यारच्या दंशाने दोघांचीही प्रकृती अतिशय गंभीर झाली होती. सर्पदंशतज्ज्ञ डॉ.सदानंद, डॉ.पल्लवी, डॉ.योगेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेली चार दिवस अहोरात्र अथकपणे प्रयत्न करून आजोबा आणि नातीचा जीव वाचविला. दरम्यान, जगदाळे कुटुंबीयांनी अतिशय भावनिक होऊन डॉ.राऊत यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
आजोबा अशोक जगदाळे व नात अनन्या हे रात्री जमिनीवर झोपले होते. रात्री साडेबारा वाजता अनन्या अचानक रडायला लागली. तिच्या उजव्या कानाच्या पाळीच्या मागे दंशाच्या अगदी छोट्या खुणा दिसून आल्या. डास किंवा मुंगी चावली असावी अशी शंका आली त्यामुळे त्या ठिकाणी आयुर्वेदिक लेप लावला, पण तिला वेदना असह्य होत होत्या. तिच्या छातीत व पोटात दुखत होते. मळमळ होत होती. या वेळी इतरत्र शोध घेतला असता मण्यार जातीचा विषारी साप जवळच दिसून आला. दरम्यानच्या काळात आजोबांचेही डाव्या हाताचे बोट दुखू लागले व हात जड पडू लागला. त्यांनाही सर्पदंश झाल्याचे लक्षात आले.
अनन्याला व आजोबा अशोक यांना तत्काळ नारायणगाव येथे डॉ.राऊत यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. वेळ वाया न घालवता डॉ.राऊत यांनी दोन्ही रुग्णांवर तातडीने उपचार सुरू केले. डॉक्टरांनी रुग्णांना दाखल करताना डॉ.राऊत यांनी सांगितलेली लक्षणे खरी ठरत होती. मण्यारच्या दंशाचा मेंदूवर आणि हृदयावर परिणाम दिसू लागला होता. रात्री एक वाजेपासून डॉक्टर व सर्व टीम रुग्णांची काळजी घेत होती.