मुंबई - लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले. तरुण पिढीली संधी देण्यासाठी मी निवडणूक न लढण्याचा निर्णय आमच्या कुटुंबात घेण्यात आल्याचं पवार यांनी सांगितले. तसेच मावळमधून पार्थ पवार लोकसभेची निवडणूक लढवतील, हेही पवार यांनी स्पष्ट केले. मात्र, रोहीत पवारांबद्दल प्रश्न विचारला असता, त्यांनी लोकसभेसाठी रोहितचा कुठलाही विचार नसल्याचं स्पष्ट केलंय.
माझ्या कुटुंबातील दोन सदस्य निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे, माझ्या कुटुंबातील सर्वच सदस्यांना वाटले की तिसरा सदस्य आपल्या कुटुबातून नको. त्यामुळे मीच स्वत:हून निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. मी 14 वेळा लोकसभा निवडणूक लढवली असून जिंकलीही आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातील किती लोकांनी निवडणूक लढवायची ? असा प्रश्न करत मी तरुण पिढीला संधी देण्यासाठी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचं पवार यांनी सांगितलं.
अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे मावळ मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर, दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच पार्थ पवार यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी देण्यात यावी, अशी सर्वांची इच्छा आहे. या मतदार संघात प्राबल्य असलेल्या शेतकरी कामगार पक्षानेही तशी मागणी केली आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्याचा विचार सुरू असल्याचे पवार म्हणाले.
रोहीत पवार हेही सक्रीय झाले असून पुणे परिसरात त्यांच मोठं काम सुरूय, त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचं काय असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना, लोकसभा निवडणुकांसाठी रोहित यांचा कुठलाही विचार नाही. पवार कुटुंबीयातून दोनच उमेदवार देणार, त्यामुळे मी स्वत: माघार घेत आहे, असे पवार म्हणाले. तर, विधानसभेला रोहित पवार उमेदवार असतील का, या प्रश्नावरही पवार यांनी विधानसभेला अजून वेळ आहे, त्यामुळे ते तेव्हा पाहुया, असे पवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे सध्याजरी रोहित पवार निवडणुकांच्या मैदानात नसले, तरी विधानसभेच्या रिंगणात उतरु शकतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आघाडीबाबत भूमिका स्पष्ट केली. तसेच, उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर करण्याबाबतही मत मांडताना माढा लोकसभा मतदारसंघातून लढणार नसल्याचेही त्यांनी मान्य केलं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांची अन् कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र, पक्षाने माझी उमेदवारी जाहीर केली नाही. तसेच नव्या पिढीला संधी देण्यासाठी मी निवडणूक न लढण्याचा विचार आमच्या कुटुंबीयांत झाल्याचे पवार यांनी सांगितले.