पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून सन्मानकारक वागणूक मिळत नसल्याने, विश्वासात घेतले जात नसल्याने माजी आमदार विलास लांडे गट अस्वस्थ असून, ‘सन्मान मिळत नसेल, तर पक्षात राहून करायचे काय?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे. राष्ट्रवादी वाचवायची असेल, तर महापौर आणि पक्षनेत्या बदला, अशी जोरदार मागणी लांडे गटाने केली आहे. त्यामुळे महापौर आणि पक्षनेत्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी सुरू झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांमधील गटबाजीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नुकसान झाले आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे पक्षाचे ज्येष्ठ नेतेही स्थानिक गटबाजीला प्रोत्साहन देत असल्याने पक्षात अस्वस्थता वाढत आहे. भोसरी, पिंपरी, चिंचवड विधानसभेच्या निवडणुकीत पक्षांतर्गत गटबाजीचा फटका पक्षाला बसला. विद्यमान आमदार लांडे, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, चिंचवडला नाना काटे यांचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीत वैयक्तिक द्वेषापोटी राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांनी अन्य विरोधी उमेदवारांशी हातमिळवणी केली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला. अंतर्गत गटबाजीमुळे राष्ट्रवादीला निवडणुकीत फटका बसला. त्यानंतरही राष्ट्रवादीतील गटबाजी कायम आहे. निवडणुकीनंतर झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात पक्षनेते शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. माजी आमदार लांडे यांनी जाहीरपणे पक्षातील गटबाजीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. पक्षपातळीवर बदल करावेत, अशी मागणी केली होती. पक्षात सन्मान मिळणार नसेल, तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अन्य पक्षांचा मार्ग धरतील, अशी भीती व्यक्त केली होती. (प्रतिनिधी) पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीतील ठरावीक स्वयंघोषित नेते मनमानी पद्धतीने काम करीत आहेत. सर्व वॉर्डांच्या विकासासाठी समान निधी, नगरसेवकांचे प्रश्न समजून घेऊन त्यांची सोडवणूक करणे गरजेचे आहे. असे असताना गटातटांचे राजकारण सुरू आहे. याच्या कारणांचा शोध पक्षनेतृत्वाने घ्यायला हवा. सर्व नगरसेवकांशी संवाद साधायला हवा. त्यांचे म्हणणे जाणून घ्यायला हवे. महापौरपदासाठी तिघांनाही संधी मिळणार होती. त्यापैकी विद्यमान महापौरांचा कालखंड संपला असतानाही नवीन निवड होऊ नये, म्हणून स्थानिक नेते प्रयत्नशील आहेत. सर्वांना समान संधी मिळावी. पक्षातील काही लोक सन्मानकारक वागणूक देत नाहीत. महापौर आणि पक्षनेतेपदासाठी सक्षम नगरसेवकांना संधी मिळावी. -विलास लांडे (माजी आमदार)
राष्ट्रवादीमध्ये गटबाजी
By admin | Published: March 09, 2016 12:35 AM