पुणे : मिठाईच्या दुकानातील सर्व प्रकारच्या मिठाईच्या ट्रेला ‘बेस्ट बिफोर’चा टॅग लागु लागल्याने मिठाईचा गोडवा वाढू लागला आहे. मिठाई किती दिवस टिकणार ही तारीख असल्याने ग्राहकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच मिठाई दुकानदारांकडूनही शासन आदेशाप्रमाणे ही माहिती लावण्यास सुरूवात केली आहे. ‘लोकमत’ पाहणीमध्ये मागील २० दिवसांतच ७० टक्के दुकानदारांनी ही माहिती लावल्याचे आढळून आले.
भारतीय खाद्य सुरक्षा मानके संस्थेतर्फे मिठाईचा ताजेपणा नमुद करण्याचे बंधन मिठाई दुकानदारांवर घातले आहे. त्याची अंमलबजावणी दि. १ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. याअनुषंगाने ‘लोकमत’ने शहराच्या विविध भागातील १९ मिठाई दुकानांमध्ये जाऊन पाहणी केली. यामध्ये दुकानारांमध्ये जनजागृती झाल्याचे दिसून आले. एकुण १३ दुकानांमध्ये मिठाई कधीपर्यंत खाण्यास योग्य आहे, याची तारीख नमुद केल्याचे आढळून आले. दोन दुकानांमध्ये तर मिठाई तयार कधी केली आणि ती किती दिवस टिकेल, या दोन्ही तारखा नमुद करण्यात आल्या होत्या. काही छोट्या दुकानांनी मात्र याकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. स्टीकर छापायला टाकले असल्याचे दोन दुकानदारांनी सांगितले. तर इतरांनी लावणार असल्याचे उत्तर देत अधिक बोलणे टाळले.
‘बेस्ट बिफोर’ तारखेच्या आत मिठाई संपली नाही तर ताजी मिठाई ठेवली जाते. त्यानुसार तारीख लावली जात असल्याचे एका विक्रेत्याने सांगितले. एका विक्रेत्याने मात्र नाराजीचा सुर लावत या प्रक्रियेला विरोध केला. काही ग्राहकांनी टॅगविषयी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. या माहितीमुळे मिठाई घरी किती दिवस टिकेल, हे कळते. तारखेपुर्वीच मिठाई खराब झाली तर दुकानदाराला जाबही विचारता येऊ शकतो, असे ग्राहकांनी सांगितले. एका ग्राहकाने मात्र माहिती तारीख नसली तरी दुकानदारावर विश्वास असल्याचे नमुद केले. काही ग्राहकांना याविषयी माहिती नसल्याचे आढळून आले. टॅगविषयी काहीही तक्रार न करता ते मिठाई खरेदी करत होते.-----------------------नवीन नियमाची दुकानादारांकडून अंमलबजावणी केली जात आहे. आतापर्यंत सुमारे १२० दुकानांची पाहणी केली असून जवळपास १०० दुकानांमध्ये तारीख लावण्यात आल्याचे दिसून आले. प्रशासनासह मिठाई, फरसाण संघटनेमार्फतही सध्या जनजागृतीवर भर आहे. मात्र दि. १ नोव्हेंबरपासून माहिती न लावलेल्या दुकानांवर कारवाई सुरू केली जाणार आहे.- सुरेश देशमुख, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन---------------दुकानदारांनी नियमांनुसार माहिती लावण्यास सुरूवात केली आहे. प्रत्येक मिठावईवर लेबल लावले जात आहे. आमचा याला विरोध असला तरी नियमांचे पालन आम्ही करत आहोत.- श्रीकृष्ण चितळे, कार्याध्यक्ष, पुणे शहर मिठाई अॅन्ड फरसाण असोसिएशन--------------कोणती मिठाई किती दिवस खावीदुधापासून बनविलेली -२ ते ३ दिवसमैदा, ड्रायफ्रुट्स पासून बनविलेली - ८ ते १५ दिवसबेसनापासून तयार केलेली - १५ दिवसखव्यापासून बनविलेले पेढे - ३ ते ४ दिवस--------------