तळेगाव ढमढेरे : जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक मुलांच्या गुणवत्तावाढीसाठी परिश्रम घेत आहेत. त्याचे फलित म्हणजे शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता वाढत असल्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडे पालकांचा कल वाढत चालला असल्याचे मत पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी व्यक्त केले.
शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने तळेगाव ढमढेरे शिरूर तालुक्यातील आदर्श शिक्षक, शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक, शिक्षक सभासदांची गुणवान मुले, सेवानिवृत्त सभासद यांचा गुणगौरव व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या रेखा बांदल, जिल्हा बँकेच्या संचालिका डॉ. वर्षा शिवले, शिरूर बाजार समितीचे सभापती शंकर जांभळकर, उपसभापती विकास शिवले, पंचायत समितीच्या उपसभापती सविता पऱ्हाड, माजी उपसभापती जयमाला जकाते, माजी सभापती सुभाष उमाप, पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर, शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे सभापती संतोष शेळके, उपसभापती श्वेता कर्पे, संतोष विधाटे, प्रदीप गव्हाणे, राज्य पदवीधर शिक्षक संघटनेचे सरचिटणीस अनिल पलांडे व विस्तार अधिकारी रत्नमाला मोरे उपस्थित होते.
निर्मला पानसरे म्हणाल्या, की जिल्ह्यामध्ये शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांमध्ये शिरूर तालुक्यातील विद्यार्थ्यांची संख्या जास्त असून शिरूर तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. गावामध्ये ज्याप्रमाणे अलिशान मंदिर उभारत असतात त्याप्रमाणे शाळांची उभारणी झाली पाहिजे त्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आवश्यक ती मदत केली जाईल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपत कांदळकर व सुनील भोरकडे यांनी केले, तर प्रास्ताविक शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे सभापती संतोष शेळके यांनी केले व आभार शिवाजीराव वाळके यांनी मानले.
१५ तळेगाव ढमढेरे
शिक्षकांना मार्गदर्शन करताना निर्मला पानसरे.