जिल्हा परिषदेवर हक्कभंग आणणार, पालकमंत्री गिरीश बापटांचा गंभीर इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 02:01 AM2018-12-07T02:01:44+5:302018-12-07T02:01:57+5:30
जिल्ह्याचा पालकमंत्री असून देखील जिल्हा परिषदेच्या विविध कार्यक्रमांना मला न बोलावता राजशिष्टाचाराची पायमल्ली होत आहे.
पुणे : जिल्ह्याचा पालकमंत्री असून देखील जिल्हा परिषदेच्या विविध कार्यक्रमांना मला न बोलावता राजशिष्टाचाराची पायमल्ली होत आहे. यामुळे संतापलेले जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी थेट जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिकाऱ्यावर हक्कभंग आणणार असल्याचे येथे सांगितले. यासाठी योग्य ठिकाणी तक्रार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापौर बंगला येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बापट यांनी ही माहिती दिली.
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने गुरुवारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कृषिभूषण डॉ. अप्पासाहेब पवार पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास बापट यांना बोलावण्यात आले नाही. शिवाय, कार्यक्रम पत्रिकेत नावही टाकण्यात आले नाही, या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले,राजशिष्टाचारानुसार पालकमंत्री या नात्याने मला जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमांना बोलावणे आणि निमंत्रण पत्रिकेत नाव टाकणे बंधनकारण आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमांना मला न बोलावता डावलले जात आहे. ही बाब माझ्या लक्षात येत होती, पण याकडे दुर्लक्ष केले होते. आधीच्या पालकमंत्र्यांच्या काळात जिल्हा परिषदेकडून राजशिष्टाचार पाळला जात होता, मग आता का पाळला जात नाही ? असा सवा उपस्थित करत बापट यांनी जिल्हा परिषदेच्या संबंधीत अधिका-यांवर आणि व पदाधिका-यावर कारवाई करण्यासांठी योग्य ठिकाणी तक्रार करणार असल्याचे सांगितले.