गुळुंचेत गायरान गटाची हद्दनिश्चिती, गटातील वस्तीविषयी मोजणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 02:29 AM2018-01-31T02:29:15+5:302018-01-31T02:29:26+5:30
नीरा : गुळुंचे (ता.पुरंदर) येथील सरकारी गायरान जागा गट क्रमांक दोनच्या हद्दनिश्चितीचे भिजत घोंगडे अखेर मार्गी लागले. लोकमतचे वृत्त तसेच उमाजी नाईक ट्रस्टच्या पाठपुराव्याने अखेर सोमवारी (दि. २९) मोजणी अधिकाºयांनी या गटाची हद्द निश्चित केली. मात्र या हद्दीत येणाºया वस्तीतील घरे नेमकी गायरान जागेत आहेत की गावठाण जागेत यावर खुद्द हद्द निश्चित करणाºया अधिकाºयांनी मौन धारण केल्याने प्रश्न सुटला की नवीन प्रश्न निर्माण झाला, याविषयी संदिग्धता निर्माण झाली आहे.
गुळुंचे येथे गायरान जागांचे तीन गट आहेत. पैकी गट क्रमांक दोनचे क्षेत्र सातबारा उताºयाप्रमाणे ६ हेक्टर ५५ आर इतके आहे. या गटात ज्योतिर्लिंग माध्यमिक विद्यालय, पशुवैद्यकीय दवाखाना, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र या शासनाच्या वास्तू तर जवळपास १०१ कुटुंबांचे वास्तव्य आहे. जागा गायरान आहे की गावठाण याविषयी अनेकदा संभ्रम निर्माण झाला होता. महसूल विभागाने २०१५ मध्ये अतिक्रमणाची यादी तयार केली होती. या यादीत येथील १०१ कुटुंबांचा समावेश अतिक्रमणात करण्यात आला. मात्र येथील काही कुटुंबांकडे मालमत्तापत्रके असल्याने जागेच्या प्रकाराबाबत असलेली संदिग्धता कायम राहिली. येथील नरवीरराजे उमाजी नाईक सामाजिक विकास संघटनेचे अध्यक्ष संजय चव्हाण यांनी महसूल विभागाच्या ४ एप्रिल २००२ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करून येथील कुटुंबांना मालकी हक्कांचे उतारे देण्याची मागणी जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे केली होती.
परंतु येथील अतिक्रमणाची नोंद गाव नमुना १ ई या रजिस्टरला नसल्याने मालकी हक्कांचा प्रश्न तसाच रेंगाळला. यानंतर ट्रस्टने गायरान जागेची मोजणी करून हद्द निश्चित करण्याची मागणी ग्रामसभा व मासिक सभेत केली. मोजणीचा ठराव दोन्ही सभांत मंजूर झाल्यानंतर तत्कालीन सरपंच रत्नमाला जगताप यांनी मोजणी फी भरून मोजणीसाठी पाठपुरावा केला. दरम्यान, हद्दनिश्चितीचे घोंगडे काही काळासाठी भिजत राहिले, याबाबत दै. लोकमतने वृत्त दिले होते. याची दखल घेत अखेर सोमवारी हद्दनिश्चित करण्यात आली.
या वेळी नूतन सरपंच संभाजी कुंभार, ग्रामपंचायत सदस्य संतोष निगडे, ग्रामसेवक पुंडलिक म्हस्के, राजेंद्र निगडे, जितेंद्र निगडे, दशरथ निगडे, विकास निगडे, ट्रस्टचे अध्यक्ष संजय चव्हाण, अक्षय निगडे, किशोर गोरगल आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
याविषयी ग्रामसेवक पुंडलिक म्हस्के म्हणाले, की गट क्रमांक दोनमधील वस्तीतील घरे गायरान जागेत असल्याचे मोजणी अधिकाºयांनी सांगितले आहे. मोजणी अधिकारी कोकरे म्हणाले, की क्षेत्र बरोबर
जुळले असून हद्द निश्चित करण्यात आली आहे. परंतु या वस्तीतील घरे गायरान जागेत आहेत का, याविषयी प्रतिक्रिया देण्यास त्यांनी टाळाटाळ केली.