हडपसर : सोलापूर महामार्गावर शनिवारी मध्यरात्री हडपसरपोलिसांनी गुटख्याने भरलेला आयशर कंटेनर पकडला. या कारवाईत कंटेनरसह सुमारे ४६ लाखांचा गुटखा आणि २० लाखांचा टेम्पो असा एकूण सत्तर लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी वाहनचालक सामीउल्लाह मुर्जता हुसैन (वय ५१, रा. एस एस मार्ग मुंबई, मूळ मुर्तजा ग्राम, मुडीलाकला, पोस्ट लोहरसन, उत्तरप्रदेश) याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्फराज शेख (रा. गोकुळनगर, अप्पर डेपो, बिबवेवाडी) हा आयशर टेम्पोची मालक आहे. त्याच्या टेम्पोमधून गुटखा घेऊन निप्पाणी व विजापूर येथून सोलापूर रोडने फुरसुंगी येथूल गोडावूनकडे जात असल्याची माहिती उपनिरीक्षक अविनाश शिंदे यांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावून येथील पंधरानंबर येथे गुटख्याने भरलेला टेम्पो ताब्यात घेतला. आज दुपारी अन्नसुरक्षा अधिकारी अनिल गवते यांनी घटनास्थळी येऊन पकडलेल्या तंभाखूजन्य पदार्थाची तपासणी केली.
सुमारे 350 पोत्यामधून 46 लाख रूपये किंमतीचा हिरा पानमसाला गुटखा त्यामध्ये आढळून आला. तसेच सुमारे 20 लाख रूपये किंमतीचा टेम्पो या कारवाईत जप्त करण्यात आला आहे. हा माल बाजारात दुप्पट किंमतीने विकला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. अन्न व औषध प्रशासन अधिकारी गवते यांनी याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी याबाबत माहिती दिली.