शीतल मुंडे -
पिंपरी : सध्या तरुणाईमध्ये जिन्स, शर्ट, बूट, कॉलेज बॅग याचे क्रेझ बघायला मिळते. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेविकांमध्ये नेहमीच विविध प्रकारच्या साड्या व बांगड्यांमध्ये स्पर्धा बघायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून मात्र नव्या हेअर स्टाईलची क्रेझ वाढली आहे. अनेक नगरसेविकांबरोबर महिला अधिकारी व कर्मचारीही '' स्ट्रेटनिंग व स्मुदनिंग '' या हेअर स्टाईलकडे आकर्षित होत आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये महिला नगरसेविकांची संख्या ६४ आहे. त्यामध्येही पहिल्यांदाच नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या महिलांची मोठी संख्या अधिक आहे. नेहमीच या नगरसेविका विविध कारणांमुळे चर्चेत असतात. सध्या काही नगरसेविका नव्या हेअर स्टाइलमुळे चर्चेत आहेत. केसांना हायलाइट करणे, हेअर स्पा, स्ट्रेटनिंग व स्मुदनिंग करणे याची एक क्रेझच झाली आहे. सुरुवातीला काही हातावर मोजण्याएवढ्या नगरसेविकांनी स्ट्रेटनिंग केले होते. याबाबत एका नगरसेविकेला विचारले असता त्यांनी सांगितले की, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जावे लागते. प्रभागामध्ये विविध उद्घाटने असतात. कधी लग्नाला, तर कधी साखरपुड्याला अचानक जावे लागते. प्रत्येक वेळी चांगले दिसण्यासाठी पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळदेखील नसतो. आणि स्ट्रेटनिंग व स्मुदनिंग केल्यानंतर चेहरा चांगला दिसतो. केसामध्ये गुंता होत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यांत एक किंवा दोन वेळा हेअर स्पा करावा लागतो. स्ट्रेटनिंग, स्मुदनिंग, हेअर स्पा व हायलाइट करण्यात काही नगरसेविका आघाडीवर आहेत. नगरसेविकांकडे बघून अधिकारी महिला देखील स्ट्रेटनिंग, स्मुदनिंग केल्याचे दिसत आहे.स्टाईल खर्च स्ट्रेटनिंग स्मुदनिंग शॅम्पो हेअर स्पा
२००० ते ८००० ३००० ते ९००० १००० ते ३००० ८०० ते ३०००
सध्या पिंपरी-चिंचवड शहरात स्ट्रेटनिंग, स्मुदनिंग हेअर स्टाईल करण्याचे प्रमाण १९ ते ६० वयाच्या महिलांमध्ये वाढले आहे. कारण स्ट्रेटनिंग, स्मुदनिंग केल्यानंतर केसांमध्ये गुंता होत नाही. केसांच्या सौंदर्यात वाढ झाल्याने प्रत्येक वयातील महिला सुंदर दिसते. मात्र, स्ट्रेटनिंग केल्यानंतर केसांची खूप काळजी घ्यावी लागते. त्यासाठी वेळ व पैसा खर्च करण्याची तयारी असते, त्या महिलाचा कल वाढत आहे. - विद्या खोत, ब्यूटी पार्लर संचालिका.