तळेघर : 'जंगल वस्ती भीमाशंकर महाराज की जय' असा जयघोष करत ब्रम्हवृंद व पुजारी बांधवांनीच श्री क्षेञ भीमाशंकर येथे तिसर्या श्रावणी सोमवारीही पवित्र शिवलिंगावर जलाभिषेक करत महापूजा करण्यात आली.
बारा ज्योतिर्लिंगापैकी पुणे जिल्ह्यातील एकमेव असणार्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दरवर्षी तिसर्या श्रावणी सोमवारी मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहण्यास मिळते. परंतु गत वर्षी व चालु वर्षी कोरोना ह्या आजाराच्या महामारीमुळे सर्वच धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे तिसर्याही सोमवारी श्री क्षेञ भिमाशंकर मंदीर व परिसरामध्ये भाविक भक्त व पर्यटक यांचा शुकशुकाट होता. नियमानुसार पहाटे साडेचार ते पाच या वेळा मध्ये श्री क्षेञ भीमाशंकर मंदीरातील महापूजा व आरती विश्वस्त पुजारी यांच्या हस्ते सोशंल डिस्टंस ठेऊन करण्यात आली. यावेळी ३०० किलो विविध रंगांच्या फुलांचा वापर करुन शिवलिंग व मंदीर गाभारा सजविण्यात आला. या मध्ये झेंडु, अस्टर, चमेली, शेवंती, डिजी, गुलछडी, अशा रंगीबेरंगी फुलांचा वापर करुन मंदीर गाभारा सजविले होते.
श्री क्षेञ भीमाशंकर हे बाराज्योर्तीर्लिंगापैकी सहावे ज्योर्तिर्लिंग आहे. दरवर्षी श्रावणी महिन्यामध्ये विशेषत: दर सोमवारी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक व पर्यटक येत असतात. पंरतु या वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे असणारे श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर गेले कित्येक महिन्यांपासून बंद आहे.
घोडेगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक जिवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली डिंभे,पालखेवाडी व श्री भीमाशंकर येथे नाकाबंदी करण्यात आली असुन कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.