हवेलीत राष्ट्रवादी काँगे्रसचे वर्चस्व
By admin | Published: February 24, 2017 03:21 AM2017-02-24T03:21:10+5:302017-02-24T03:21:10+5:30
जिल्ह्यात सर्वांधिक १३ गट असलेल्या हवेली तालुक्यात राष्ट्रवादी काँगे्रसने आपले वर्चस्व कायम राखले आहे
पुणे : जिल्ह्यात सर्वांधिक १३ गट असलेल्या हवेली तालुक्यात राष्ट्रवादी काँगे्रसने आपले वर्चस्व कायम राखले आहे. तर, येथे भाजपाने प्रथम खाते उघडून ३ जागांवर विजय मिळविला आहे. हवेली तालुक्यात १३ जागांपैकी राष्ट्रवादी काँगे्रसला ८, भाजपाला ३, शिवसेनेला एक व एक अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. तर, हवेली पंचायत समितीमध्ये २६ जागांपैकी १३ राष्ट्रवादी काँगे्रसला, भाजपाला ६, शिवसेनेला ५ आणि २ जागा अपक्ष उमेदवारांनी पटकावल्या आहेत. यामुळे पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसला सभापती करण्यासाठी सेना-भाजपापैकी एकाला बरोबर घ्यावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गट-गणांच्या फेररचनेत लोकसंख्यावाढीमुळे हवेली तालुक्यात गटांची संख्या १० वरून थेट १३ झाली. यामुळे हवेली तालुक्यावर सर्वच पक्षांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते. जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष प्रदीप कंद यांनी पेरणे-वाडेबोल्हाई निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँगे्रसच्या उमेदवार कल्पना सुभाष जगताप यांच्या विरोधात सर्वपक्षीय उमेदवारांनी आघाडी केली होती. परंतु, जिल्ह्यात सर्वांधिक तब्बल १४ हजार २५८ मते मिळून कल्पना जगताप विजयी झाल्या. शहरी भागाप्रमाणेच हवेली तालुक्यातदेखील भाजपाला मतदारांनी पसंती देऊन केशवनगर-साडेसतरानळी गटात वंदना महादेव कोंद्रे, धायरी-नांदेड गटात जयश्री पोकळे आणि आंबेगाव-नऱ्हे या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातदेखील भाजपाच्या जयश्री सत्यवान भुमकर विजयी झाल्या. (प्रतिनिधी)
हवेली तालुक्यात सर्वांधिक चुरशीच्या ठरलेल्या वाघोली-आव्हाळवाडीमध्ये शिवसेनेचे ज्ञानेश्वर कटके तब्बल १४ हजार २७९ मते मिळून विजयी झाले. येथे भाजपाचे रामदास दाभाडे यांचा पराभव झाला. तर, उरुळी कांचन-सोरतापवाडी गटामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव कांचने यांची सून ऋतुजा अजिंक्य कांचन यांना पराभवाचा धक्का बसला. येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कीर्ती कांचन विजयी झाल्या आहेत.