Ironman Competition 2024: असीम साहस अन् जिद्दीच्या जाेरावर वयाच्या सत्तरीत ते ठरले ‘आर्यनमॅन’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2024 03:20 PM2024-12-06T15:20:47+5:302024-12-06T15:21:24+5:30

नवनाथ झांजुर्णे यांनी नियाेजनबद्ध आहार, व्यायाम, जाेरावर नुकत्याच बहारीन (मध्य पूर्व) येथे पार पडलेल्या ‘आर्यनमॅन ७०.३’ स्पर्धेत सहभागी हाेत ‘आर्यनमॅन’चा किताब पटकावला

He became an Aryanman at the age of seventy due to his immense courage and determination. | Ironman Competition 2024: असीम साहस अन् जिद्दीच्या जाेरावर वयाच्या सत्तरीत ते ठरले ‘आर्यनमॅन’

Ironman Competition 2024: असीम साहस अन् जिद्दीच्या जाेरावर वयाच्या सत्तरीत ते ठरले ‘आर्यनमॅन’

जयवंत गंधाले 

हडपसर : त्यांचं वय अवघं एकाेणसत्तर... वजन वाढल्यानं फिटनेस राहावा यासाठी आपल्या डाॅक्टर मुलाच्या सल्ल्यानं व्यायाम सुरू केला. जिममध्ये पर्सनल ट्रेनरच्या माध्यमातून वर्कआउट सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून ओपन वाॅटर स्विमिंगची नियमित प्रॅक्टिस सुरू झाली. त्यातूनच ठरलं आर्यनमॅन व्हायचं. मुलगा अन् सूनबाईचा सपाेर्ट हाेताच. त्याच जाेरावर नियाेजनबद्ध आहार, व्यायाम, असीम साहस अन् जिद्दीच्या जाेरावर नुकत्याच बहारीन (मध्य पूर्व) येथे पार पडलेल्या ‘आर्यनमॅन ७०.३’ स्पर्धेत सहभागी हाेत ‘आर्यनमॅन’चा किताब पटकावला. नवनाथ रघुनाथ झांजुर्णे असं या सर्वात ज्येष्ठ भारतीय आयर्नमॅनचे नाव आहे.

हडपसरचे रहिवासी असलेले झांजुर्णे हे पूर्वी किर्लाेस्करमध्ये कामगार म्हणून कार्यरत हाेते. वयाेमानानुसार स्नायू बारिक हाेणे, अशक्त हाेते अशा तक्रारी सुरू हाेत्याच. काेराेनानंतर फिटनेसकडे लक्ष देणे गरजेचे झाल्यानंतर त्यांनी एका प्रशिक्षित ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली व्यायामाला सुरुवात केली. आर्यनमॅन स्पर्धेचे विजेते राहिलेला मुलगा डाॅ. राहुल झांजुर्णे यांनी आर्यनमॅन स्पर्धेत आपणही सहभागी व्हावे यासाठी प्रेरित केल्यानंतर झांजुर्णे यांनीही मनाशी निश्चित केले. खास ट्रेनरच्या माध्यमातून स्पर्धेची तयारी करण्यास सुरू करून स्पर्धेत सहभागी हाेऊन साडेआठ तासात स्पर्धेत निश्चित ध्येय गाठत सर्वात ज्येष्ठ भारतीय आर्यनमॅन ठरले. बहारीन येथे पार पडलेल्या या स्पर्धेत झांजुर्णे यांच्या स्नूषा डाॅ. स्मिता याही निश्चित उद्दिष्ट गाठत सहाव्या आर्यनमॅन ठरल्या.

आव्हाने अनेक तरीही जिद्दीने केली मात

सायकलचा हॅण्डल पकडायला अंगठ्याची फार गरज असते. पण त्यांच्या उजव्या हाताचा अंगठा लहानपणीच तुटला. त्यामुळं हॅण्डलला ग्रीप पकडता येत नाही. त्यांच्या लहानपणी कोपराचे हाड मोडल्यामुळे आणि ते नीट न बसवल्यामुळे त्यांना वाकडा कोपर आहे. या खूप जास्त वाकड्या कोपरामुळे स्विमिंगला फार अडचणी येतात. वयाप्रमाणे त्यांना लांबचे दिसायला अंधुक दिसते. दोन वर्षांपूर्वी खांद्याचे रोटेटर कफ हे स्नायू पूर्णपणे तुटल्यामुळे एक मोठी सर्जरी करून ते जोडले गेले. तरीही त्यांनी या अडचणींवर मात करून त्यांनी हे मेडल मिळवले.

अशी असते आर्यनमॅन स्पर्धा

 ७०.३ आयर्नमॅन म्हणजे एका दमात १.९ किलोमीटर समुद्रात पाेहावे लागते. त्याचबराेबर ८९ किलोमीटर सायकलिंग करण्याबराेबरच २१ किलोमीटर रनिंग करावे लागते.

गतवर्षी या स्पर्धेत सहभागी झालाे हाेताे, मात्र निश्चित ध्येय साध्य करता आले नाही. त्यातून खचून न जाता पर्सनल ट्रेनरची मदत घेत सराव सुरू ठेवला. नियमित ओपन वाॅटर स्विमिंगसाठी हिंजवडी येथील कासारसाई धरणात पाेहण्याचा सराव सुरू ठेवला. दर रविवारी साेलापूर राेडवर लाँग डिस्टन्स सायकलिंग करतानाच तेथेच सायकल लावून आदिती गार्डनमध्ये पळायला सुरुवात केली. श्वसनावर नियंत्रण मिळवण्यासाठी नियमित प्राणायाम आणि मेडिटेशन सुरू केले. वजन आटाेक्यात राहण्यासाठी नियाेजनबद्ध आहार सुरू ठेवला. यामुळेच ही स्पर्धा जिंकू शकलाे. - नवनाथ झांजुर्णे, आर्यनमॅन विजेता

Web Title: He became an Aryanman at the age of seventy due to his immense courage and determination.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.