पुणे : वाहनचोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार घरफोडीसाठी आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून, गुन्हे शाखेच्या युनिट २च्या पथकाने त्याला अटक केली आहे.
रफिक हुसेन शेख (वय ३६, रा. चिंतामणीनगर, सय्यदनगर, हडपसर) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून दोन वाहन चोरीचे गुन्हे, दोन घरफोडीचे गुन्ह्यातील ३२ ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख एक लाख ६० रुपये व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा तीन लाख ८५ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेतील युनिट-२च्या पथकातील पोलीस अंमलदार गजानन सोनुने व कादीर शेख यांना घरफोडी चोरीच्या तयारीने रेकॉर्डवरील गुन्हेगार के. के. मार्केट येथे आला असल्याची समजले. त्यानुसार पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे, पोलीस अंमलदार उत्तम तारू, निखिल जाधव, समीर पटेल, गजानन सोनुने, कादीर शेख यांनी के. के. मार्केटच्या पार्किंगमध्ये जाऊन तेथे दुचाकी वाहनासह उभ्या असलेल्या रफिक शेख याला पकडले.
शेख याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने ४-५ दिवसांपूर्वी धनकवडी, सहकारनगर भागात दिवसा घरफोडी केल्याची कबुली दिली.
शेख याच्याकडून सहकारनगर पोलीस ठाण्यातील २ गुन्हे, वानवडी, हडपसर पोलीस ठाण्यातील प्रत्येक एक असे चार गुन्हे उघडकीस आणले आहेत. शेख हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, काही दिवसांपूर्वीच तो तुरुंगातून जामिनावर सुटला आहे. त्याच्यावर एकूण ३६ गुन्हे दाखल आहेत.