Irrfan Khan Passed away: ‘त्या’च्या कॅमेऱ्याला अँजेलीना जोली गवसली नाही पण इरफान खान सापडला..
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 06:49 PM2020-04-29T18:49:10+5:302020-04-29T19:00:09+5:30
चौदा वर्षांपूर्वी पुण्यात झालेल्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणाची बातमी चांगलीच गाजली होती.
पुणे: चौदा वर्षांपूर्वी पुण्यात झालेल्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणाची बातमी चांगलीच गाजली होती...त्या चित्रपटाचे नाव होते ' द माईटी हार्ट'. या चित्रपटामध्ये हॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री अँजेलीना जोली, ब्रॅड पिट यांच्यासमवेत अभिनेता इरफान खान देखील प्रमुख भूमिकेत झळकला होता..आणि या चित्रपटाचे काही चित्रीकरण हे औंध परिसरात झाले होते..त्यासाठी हे तिघे काही दिवस पुण्यात वास्तव्यास होते. त्यावेळी अँजेलीना रिक्षेतून फिरत असल्याचा फोटो व्हायरल झाला होता..त्या संपूर्ण पुण्यातील तिच्या वास्तव्यावर एफटीआयआय चा माजी विद्यार्थी सौरभ डे याने डॉक्युमेंटरी केली होती..यामध्ये त्याला अँजेलीना गवसली नाही पण इरफानचा संवाद मात्र कैद झाला.
ही घटना आहे 2006 ची. इरफान खान या चित्रपटात कराचीच्या पोलीस प्रमुखाच्या भूमिकेत होता. सशक्त अभिनयाच्या जोरावर त्यांनी या चित्रपटात जागा मिळविली.डॅनियल पर्ल या अमेरिकन पत्रकाराचे अपहरण करुन त्याची हत्या करण्यात आली होती. यावर चित्रपटाचे कथानक बेतले होते.
पाकिस्तानात या चित्रपटाच्या शुटींगला परवानगी न मिळाल्याने कराची सारखा सेट पुण्यातील औंध परिसरात उभारण्यात आला होता़. या चित्रपटातील इरफान खान याच्या भूमिकेचे बहुतांश शुटींग पुण्यात झाले होते़ तेव्हा हे तिघे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये उतरले होते. अँजेलीना जोली आणि ब्रॅड पिट यांचे छायाचित्र टिपण्यासाठी देशपरदेशातील पापाराजी पुण्यात आले होते़ दोघांचे फोटो मिळावेत व त्यांच्या शुटींगची माहिती मिळाली, यासाठी पुण्यातील पत्रकारांचीही मोठी धावपळ उडत होती़ त्यामुळे शुटींगसाठी बाहेर पडताना ते नेहमी वेगवेगळ्या शक्कल लढवित. कधी हॉटेलमधून सामान नेण्यात येणा-या लिफ्टने मागच्या बाजूने ते उतरत़ तर कधी रिक्षातून प्रवास करत असे़ एकदा ते असेच रिक्षातून प्रवास करतानाचा फोटो मिळाला होता. इरफान खानच्या निधनानंतर या चित्रपटाची अनेकांना झाली...मात्र इरफान खान या चित्रपटात होता याकडे दुर्लक्ष झाले असल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली.
.............
' द माईटी हार्ट' या चित्रपटाचे शूटिंग पुण्यात झाले होते. त्यासंदर्भात अँजेलीना आणि ब्रॅड पिट यांच्यासमवेत इरफान खान देखील पुण्यात आला होता. ते दोघे पुण्यात माध्यमांना चुकवून कसे फिरायचे यावर एफटीआयआयच्या माजी विद्यार्थ्याने ' चेसिंग अँजेलीना' यावर डॉक्युमेंट्री केली होती..त्यात त्याने इरफान खान यांच्याशी संवाद साधला असल्याचे आठवते- चंद्रशेखर जोशी, माजी जनसंपर्क अधिकारी एफटीआयआय
......
एफटीआयआयचे विद्यार्थी झेड.आर अंजन आणि मनोज नायर यांच्या 1990 सालच्या ' मॉर्निंग' या डिप्लोमा फिल्ममध्ये अभिनेता इरफान खान याने भूमिका केली असल्याची माहिती चंद्रशेखर जोशी यांनी दिली.
.....