उपवासाला साेडायला मागविले पनीर बटर, प्रत्यक्षात आले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2019 09:05 PM2019-07-07T21:05:09+5:302019-07-07T21:07:18+5:30
उपवास साेडण्यासाठी एका ग्राहकाने पनीर बटर मागवले परंतु हाॅटेलने बटर चिकन पाठविल्याने ग्राहक मंचाने झाेमॅटाे आणि हाॅटेलला 55 हजार रुपयांचा दंड ठाेठावला आहे.
पुणे : उपवास सोडण्याकरिता एका वकिलाने पनीर बटरची ऑर्डर दिली. मात्र प्रत्यक्षात त्याला बटर चिकन आल्याने ते चिकन पाठविणा-या झोमँटो आणि एका हॉटेलला पुणे अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने 55 हजारांचा दंड ठोठावला. न्यायालयाने आदेशात 45 दिवसांच्या आत ग्राहकाला दंडाची रक्कम देण्याचे आदेश दिले आहेत. दंड देण्यास उशीर झाल्यास त्या रकमेवर दहा टक्के व्याज आकारले जाणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
षन्मुख देशमुख हे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकिली करतात. 31 मे रोजी 2018 ते कामानिमित्त पुण्यात आले होते. गुरुवारी त्यांचा उपवास होता. सायंकाळी उपवास सोडण्याकरिता त्यांनी झोमँटो अँपवरुन पनीर बटर मसाला मागवले. देशमुख ज्याठिकाणी थांबले होते तिथे जेवणाचे पार्सल आले. जेवण वाढून घेतल्यावर ते पनीर नसून चिकन असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर देशमुख यांनी पार्सल देणा-या झोमँटोच्या डिलिव्हरी बॉयला विचारले असता त्याने सांगितले, की यात आपला काही दोष नसून जे पार्सल दिले जाते ते न उघडता संबंधित ग्राहकापर्यंत पोहचवले जाते. त्यानंतर देशमुख यांनी संबंधित हॉटेलशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी दुसरे जेवण पाठवत असल्याचे सांगितले. दुस-या डिलिव्हरी बॉयने जेवणाचे पार्सल आणले. पावतीवर पनीर बटर मसाला लिहिले होते. पण देशमुख यांनी पार्सल उघडल्यानंतर त्यात पुन्हा बटर चिकन असल्याचे निदर्शनास आले.
देशमुख यांनी वकिल संदेश गुंडगे यांच्याव्दारे झोमँटो आणि संबंधित हॉटेलला कायदेशीर नोटीस पाठवली. त्यात त्यांनी धार्मिक भावना दुखावल्याचे सांगत नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. त्यावर त्यांना त्यांच्याकडून कुठलेही उत्तर मिळाले नाही. झोमँटो आणि हॉटेलचालकाकडून कुठला प्रतिसाद न मिळाल्यामुळे देशमुख यांनी ग्राहक तक्रार निवारण मंचात धाव घेतली. आणि नुकसान भरपाईपोटी 5 लाख आणि मानसिक त्रासाबद्द्ल 1 लाख रुपये देण्याची मागणी केली. या तक्रारीवर कारवाई करत ग्राहक मंचाने झोमँटो आणि हॉटेलला 55 हजार रुपयांचा दंड ठोठावला. ते पैसे 45 दिवसांत देण्याचे आदेश दिले.