रांजणगाव सांडस: दौंड तालुक्यातील केडगाव येथे एका खासगी रुग्णालयात ८ जुलैच्या रात्री बाळाचा जन्म झाला. नवीन जन्मलेल्या बाळाच्या ओठावर आणि जिभेला सोने लावण्याची, चाटवण्याची काही ठिकाणी प्रथा आहे. त्याप्रमाणे ४, ५ नातेवाईकातील महिलांनी सोन्याची अंगठी आळीपाळीने बाळाच्या जिभेला लावली. काही क्षणातच बाळाने ती गिळून टाकली. अचानकच वातावरण गंभीर झाली. डॉक्टरांनी तातडीने बाळाची क्ष- किरण तपासणी केली. त्यावेळी अंगठी बाळाच्या पोटात आढळून आली.
डॉक्टरांनी लगेचच बाळाला मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्याला पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक येथे पाठवले. येथे डॉ.कांचनकुमार यांनी प्राथमिक तपासणी करून दवाखान्यात दाखल करून घेतले. डॉ.किरण शिंदे यांनी तातडीने दुर्बिणीद्वारे अंगठी काढण्याचे ठरवले. अवघ्या काही तासांचेच आयुर्मान असलेल्या बाळाच्या जीवाला रिंग मुळे धोका उद्भवू शकत होता.
टोकदार रिंगमुळे आतड्याला इजा होण्याची दाट शक्यता होती. या सर्व गोष्टी विचारात घेवून नातेवाईकांना विश्वासात घेऊन समजावून सांगण्यात आले. अत्यंत जड अंतःकरणाने डॉक्टरांवर पूर्ण विश्वास ठेवून नातेवाईकांनी परवानगी दिली. भूलतज्ञ लोंढे यांनी अत्यंत कौशल्याने बाळाला पूर्ण भूल दिली. डॉक्टरांच्या पथकाला अतिशय सावधगिरी ने आपले सर्व कौशल्य पणाला लावून अंगठी अलगदपणे पोटातुन काढण्यात यश आले. थोड्या वेळाने बाळ रडत असल्याची खातरजमा करून यशस्वी रित्या वॉर्डमध्ये नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आले. खूपच दुर्मिळ अशा या प्रोसिजर साठी रुबी हॉल मधल्या अद्ययावत एन्डोस्कोपी युनिट आणि तंत्रज्ञांची खूपच मदत झाली असे डॉ किरण शिंदे म्हणाले.