कोरोनाचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा घेणार सेवेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 06:46 PM2020-03-30T18:46:39+5:302020-03-30T18:48:38+5:30
महापालिकेने पुढील काही महिन्यांकरिता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय
पुणे : शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागापुढे या आपत्तीसोबत लढण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता आहे. एकीकडे जबाबदाऱ्या वाढत असतानाच दुसरीकडे मात्र मनुष्यबळ कमी पडू लागले आहे. त्यामुळे मनुष्यबळाची ही चणचण दूर करण्यासाठी महापालिकेने पुढील काही महिन्यांकरिता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. मागील पाच वर्षात सेवानिवृत्त झालेल्या सेवकांना मदत घेतली जाणार आहे.
केवळ पुणे महापालिकाच नाही तर राज्यातील अन्य महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांनाही मनुष्यबळाचा प्रश्न भेडसावत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यामध्ये वाढत चालला आहे. रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामांचा डोंगर उभा राहिलेला असताना ही कामे आणि जबाबदाऱ्या पाडण्यास कर्मचारी संख्या कमी पडू लागली आहे. त्यामुळे राज्य शासनानेच याबाबतचे आदेश दिले आहेत.
आरोग्य विभागातून गेल्या पाच वर्षात सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची यादी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या कर्मचाऱ्यांना नियुक्त करताना त्यांची काम करण्याची ईच्छा असेल तरच त्यांना सेवेत घेतले जाणार आहे. यासोबतच त्यांचे आरोग्यही तपासण्यात येणार आहे. महापालिकेमधील शेकडो पदे रिक्त आहेत. शासनमान्यता नसल्याने ही पदे भरता येत नाहीत. महापालिकेच्या आरोग्य विभागातील सुमारे ५० टक्के पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यास राज्य शासनाने नुकतीच मान्यता दिली. मात्र, या भरतीसाठी काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे पालिकेने सेवानिवृत्त कर्मचा-यांना पुन्हा तात्पुरत्या सेवेत रुजू करुन घेण्याचे ठरविले आहे. शासनाने पालिका कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० केले आहे. त्यामुळे मागील दोन वषार्तील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची वाढीव मुदत या कालावधीत देणे शक्य आहे का याचाही विचार प्रशासनाकडून सुरु आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागात वर्ग - १ ची १२३ पदे तातडीने भरण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार, या पद भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची ही पदे भरताना शैक्षणिक पात्रतेसह अनुभवाचा विचार केला जाणार आहे. या मुलाखती स्काईप, व्हिडीओ कॉलिंग आणि अन्य ऑनलाइन सुविधांचा वापर करुन घेतल्या जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.