पुणे : आरोग्य सेनेचे हे सर्वेक्षण हे वैद्यकीय सत्यशोधन आहे. कोरोना महासाथ आणि ढासळणारी अर्थव्यवस्था यांनी कष्टकऱ्यांचे जगणे अवघड केले आहे. आरोग्य सेनेने या वैद्यकीय सत्यशोधनाच्या आधारे कष्टकऱ्यांचा आवाज दिल्ली पर्यंत नेला पाहिजे. त्याचबरोबर रेशनिंग च्या दुकानांमधून मिळणाऱ्या धान्यांची सँपल्स गोळा करून त्यांचा दर्जाही तपासायला हवा,” असे मत कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केले.
आरोग्य सेनेतर्फे सुरु होणाऱ्या हमाल पंचायतीच्या कष्टकऱ्यांचे आरोग्य आणि आहार सर्वेक्षण शिबिराचे उद्घाटन हमाल भवन येथे झाले. यावेळी आढाव बोलत होते. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य म्हणाले, “ आरोग्य सेना ही नेहमीच कष्टकरी, वंचित आणि दु:खीतांचा आवाज बनली आहे. काँग्रेस सरकारच्या काळात महागाई वाढत असताना आरोग्य सेनेने असेच सर्वेक्षण करून ‘अर्धपोटी कष्टकऱ्यांचा आवाज’ हा अहवाल प्रकाशित करून कष्टकऱ्यांचे उत्पन्न आणि आहार यांचे व्यस्त प्रमाण देशापुढे आणले होते. आज महागाई त्याकाळच्या पेक्षा अनेक पटींनी वाढली आहे. कोरोनाच्या साथीने त्यात भर घातली आहे. आता पुन्हा आरोग्य सेनेला कष्टकऱ्यांच्या जगण्याची वस्तुस्थिती देशापुढे आणली पाहिजे. या सर्वेक्षणाचा आरंभ त्यासाठी करण्यात आलेला आहे. ”
या सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्यात एकूण ६० कष्टकऱ्यांची आरोग्य तपासणी, आहार आणि आर्थिक स्थिती यांचे ३० मुद्द्यांच्या आधारे सर्वेक्षण करण्यात आले. यात वय, लिंग, वजन, उंची, बीएमआय, तापमान, पल्स, रक्तदाब, रक्तशर्करा, हिमोग्लोबिन, व्यसने, कुटुंबातील सदस्य संख्या, मासिक उत्पन्न, खाण्यावरील मासिक खर्च, सध्या असणारे आजार, आरोग्यावरील मासिक खर्च, प्रतिदिन आहार आणि आहारातील उष्मांक इ. मुद्द्यांचे सर्वेक्षण करण्यात आले.