Pune Fights Omicron: महापालिकेच्या वतीने आरोग्य यंत्रणा सज्ज; नागरिकांनी दोन्ही डोस घ्या, महापौरांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 11:54 AM2021-12-06T11:54:24+5:302021-12-06T11:54:39+5:30
पुणेकरांनी अजिबात घाबरू जाऊ नये. पण अशा परिस्थितीत काळजी घेणे महत्वाचे आहे
पुणे : दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटने आता महाराष्ट्रातही प्रवेश केला आहे. डोंबिवलीमध्ये पहिला रुग्ण आढळल्यानंतर आता प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. पुण्यातही ओमायक्रॉन या नव्या विषाणूने शिरकाव केला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल ६ तर पुणे शहरात एक असे रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांना ''ज्या नागरिकांनी अजूनही कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही, त्यांनी ती त्वरित घेणे अत्यंत गरजेचं असल्याचे आवाहन फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केले आहे.''
मोहोळ म्हणाले, पुणेकरांनी अजिबात घाबरू जाऊ नये. पण अशा परिस्थितीत काळजी घेणे महत्वाचे आहे. फिनलँड येथून आलेल्या एका पुणेकर व्यक्तीला ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. लागण झालेल्या व्यक्तीची प्रकृती चांगली आहे. तरी देखील खबरदारीचा उपाय म्हणून त्या व्यक्तीच्या इमारतीमधील सर्वांची RT-PCR टेस्ट करण्यात आलेली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
''पुणेकर नागरिकांनी कोणत्याही अफवांनी घाबरून जाण्याची गरज नाही. महापालिकेच्या वतीने सर्व आरोग्य यंत्रणा सतर्क आणि सुसज्ज ठेवण्यात आलेली आहे. परदेशातून आलेल्या आणि पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येणार असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.''
''सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ज्या नागरिकांनी अजूनही कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही, त्यांनी ती त्वरित घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे आवाहन महापौरांनी पुणेकरांना केले आहे.''
पुणे शहरात एक रुग्ण
पुणे शहरात फिनलंड येथून आलेल्या ४७ वर्षीय पुरुषाला ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झाला आहे. शहरातील ओमायक्रॉम बाधित रुग्ण नियमित सर्वेक्षणात आढळून आला आहे. ही व्यक्ती १८ ते २५ नोव्हेंबर या दरम्यान फिनलंड येथे गेली होती. रुग्णाला २९ नोव्हेंबर रोजी थोडा ताप आल्याने चाचणी केली असता, कोरोना बाधित असल्याचे निदान झाले. त्याने कोव्हिशिल्ड लसीचे दोन डोस घेतले असून, त्यांना सध्या कोणतीही लक्षणे नाहीत. रुग्णाची प्रकृतीही स्थिर आहे.
पिंपरी चिंचडमध्ये सहा रुग्ण
नायजेरियामधून आलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील तिघांसह त्यांच्या संपर्कातील तीन अशा एकूण सहा जणांचे ओमायक्रॉन अहवाल रविवारी सायंकाळी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. महापालिकेच्या पिंपरीतील जिजामाता रुग्णालयातील विलगीकरणात हे रुग्ण दाखल केले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.