पुणे : बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी व त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्या जामिनावर सरकारपक्षाच्या वतीने मंगळवारी आपले म्हणणे सादर करण्यात आले आहे. त्यावर १७ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. विशेष न्यायाधीश जे. टी. उत्पात यांच्या न्यायालयात ही सुनावणी होणार आहे.गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्यानंतर त्यांच्या जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता़ या अर्जावर ५ मार्च रोजी सुनावणी होणार होती. मात्र, सरकारी पक्षाने जामीन अर्जावर म्हणणे मांडण्यास मुदत मागितली. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी झाली. या वेळी सरकारी पक्षाने लेखी स्वरूपात आपले म्हणणे सादर केले आहे. यावर आता १७ मार्चला सरकार पक्षाचा युक्तिवाद होणार असून, त्यानंतर जामिनाबाबत निर्णय होणार आहे़डीएसके यांच्या वतीने, आपल्या ८०० कोटी रुपयांच्या मालमत्ता विक्री करण्यास परवानगी मिळावी, आर्थिक गुन्हे शाखेने त्यांची सर्व बँक खाती गोठविली आहेत़ त्यामुळे कामगारांचे पगार व अन्य खर्चासाठी चार बँक खाती खुली करावीत, असा अर्ज न्यायालयात केला आहे़ यावरही १७ मार्चला निर्णय होण्याची शक्यता आहे़
डीएसकेंच्या जामिनावर १७ मार्चला सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 1:10 AM