पुणे : शहराला सोमवारी रात्री अचानक पावसाने चांगलेच झोडपून काढले. यामुळे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांसह, पेठांमधील दुकानदार, हाॅकर्स यांच्यासह स्थानिकांचे हाल झाले. यात अनेकांच्या गाड्या बंद पडल्या. त्यामुळे लहान लेकरांना साेबत घेऊन आलेल्या कुटुंबांची चांगलीच तारांबळ उडाली हाेती. त्यातच विजांचा कडकडाट झाल्याने मुले घाबरत हाेती. अनेक जण जीव मुठीत घेऊन आडाेसा शाेधत हाेते. या पावसाने रस्त्यांवर पुन्हा पाणीचपाणी झाले. त्यामुळे वाहतूक कोंडीही झाली. दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले. शहरातील विविध ठिकाणी पाणी शिरल्याच्या व इतर घटना अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात नोंद झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात अडकलेल्या एकुण १२ जणांची सुखरुप सुटका करुन आपले कर्तव्य बजावले आहे.
अग्निशमन दलाकडे दिनांक १७•१०•२०२२ रोजी राञी ०९•५७ वाजल्यापासून विविध प्रकारच्या वर्द्या प्राप्त झाल्या होत्या. यामधे दिनांक १८•१०•२०२२ रोजी पहाटे ०४•०० वाजेपर्यंत पाणी शिरणे किंवा जमा होणे याच्या एकुण २० तसेच झाडपडी ०३ ठिकाणी ज्यामधे हडपसर, आकाशवाणी जवळ रस्त्यावर तर चंदननगर, बिडी कामगार वसाहत येथे रिक्षावर झाड पडले. आणि पाषाण, लोयला स्कुल येथे दुचाकीवर झाड पडले होते. यामधे दलाची मदत पोहोचण्यापुर्वी जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला नागरिकांनी दवाखान्यात रवाना केले होते.
'या' भागात शिरले पाणी
येवलेवाडी स्मशानभूमीजवळ - सुखसागर नगर, अंबामाता मंदिर - कोंढवा खुर्द, एनआयबीएम रोड - रास्ता पेठ, दारुवाला पुलाजवळ - सुखसागर नगर, डॉल्फिन चौक - बी टी कवडे रोड अग्निशमन केंद्र समोर - हडपसर, गाडीतळ - शिवाजीनगर पोलिस मुख्यालय - मंगळवार पेठ, शिवाजी स्टेडियम - कसबा पेठ, फिश मार्केट जवळ - कुंभार वाडा समोर - नारायण पेठ, मोदी गणपती - औंध, डिएव्ही स्कुल गल्ली - कसबा पेठ, पवळे चौक - कसबा पेठ, भुतडा निवास - पर्वती, मिञमंडळ चौक - गंज पेठ - भवानी पेठ
विषेश म्हणजे मंगळवार पेठ, स्वरुपवर्धिनी जवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने एक कुटूंब पाण्यात अडकले होते. तेथील स्थानिक पल्लवी जावळे यांनी मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांना कळविताच तिथे अग्निशमन अधिकाऱ्यांनी तेथील ०३ लहान मुली ०१ महिला व ०१ पुरूष (एकुण ०५) यांना सुखरुप बाहेर आणले.