पुणे : पुण्यात ढगांच्या गडगडतात मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. आज सकाळपासूनच शहरात सर्वत्र ढगाळ वातावरण झाले होते. दुपारी पावसाची चिन्हे दिसू लागली होती. अखेर ३ च्या सुमारास धुव्वादार पावसाळा सुरुवात झाली. शहरातील सर्वच रस्ते जलमय झाल्याचे दिसून आले. पावसाबरोबर सुसाट्याचा वार सुटल्याने रस्तेही सामसूम झाले होते. तसेच पुण्यात पुन्हा तीच पाणी साचण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली. अचानक सुरु झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले.
रस्त्यांवरून पाण्याचे मोठ्या प्रमाणावर लोंढे वाहत होते. किरकोळ पावसातही पुण्यातील अनेक भागात गुडघाभर पाणी साचल्याचे दिसून आले. तर मुसळधार पावसात तर शहरातील गल्लोगल्लीत नदी वाहत असल्याचे भीषण चित्र पाहायला मिळाले. रस्त्यांवरील बरेच चेम्बर बंद झाकणाचे आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून राहत आहे. काही उताराच्या भागावरून पाणी वाहत असल्याने त्याला नदीचे स्वरूपच आले आहे.
पुण्याच्या मध्यवर्ती भागाबरोबरच कात्रज, हडपसर, वारजे, कोंढवा, शिवाजीनगर, वडगाव, धायरी भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. उपनगरात अनेक भागात सुखसुविधा नसल्याने घराघरातही पाणी शिरू लागल्याच्या घटना घडत आहेत. नागरिक यावरूनच प्रचंड संताप व्यक्त करत असल्याचे दिसून आले आहे.
शनिवार नंतर मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होईल
तामिळनाडूपासून राजस्थानपर्यंत तयार झालेल्या द्रोणीय रेषेमुळे राज्यात मान्सून सक्रिय असून, कोकण व मध्य महाराष्ट्रात शनिवारपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. विदर्भातही पुढील दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. साधारण शनिवारनंतर आर्द्रतेचे प्रमाण कमी झाल्यानंतर राज्यातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती डॉ. अनुपम काश्यपी यांनी दिली.